जामनेर : जिल्हा परिषदेच्या ‘बीओटी’ तत्त्वावरील व्यापारी संकुलासमोरील हातगाड्यांचे अतिक्रमण नगरपालिका व पोलिसांनी बुधवारी सकाळी काढले. याच संकुलासमोर पालिका चौकात मालवाहू रिक्षा थांबत असून, त्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो, याकडे मात्र पालिकेने सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची भावना हातगाड्याधारकांनी बोलून दाखविली.
हरातील मेनरोडवर हातगाड्यावर भाजी व फळफिक्रेत्यांचे मोठे अतिक्रमण आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. संकुलातील व्यापाऱ्यांनी संकुलासमोरील हातगाड्या हटविण्याबाबत पालिकेकडे केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अतिक्रमण काढले. पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे, सहायक निरीक्षक राजेश काळे, उपमुख्याधिकारी दुर्गेश सोनवणे यांच्यासह पालिकेतील कर्मचारी व पोलिसांनी ही कारवाई केली.
गांधी चौकातून जुन्या बोदवड नाक्यापर्यंतच्या रस्त्यावर एका बाजूने झालेल्या अतिक्रमणामुळे हा रस्ता वाहतुकीस अयोग्य ठरला असल्याने या अतिक्रमणाकडेही पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे. नुकतेच या रस्त्याचे काम पालिकेने केले. मात्र अतिक्रमणामुळे रस्त्यावर झालेला खर्च वाया जाण्याची भीती व्यक्त होत आहे.