जामनेर : शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची व व्यावसायिकांची अक्षरश: तारांबळ उडाली. दिवसभर ऊन पावसाचा खेळ सुरु होता. काल रात्री व आज दिवसभर झालेल्या पावसाने बहुतेक शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाचे मोठे नुकसान झाले. मका, ज्वारीचे आधीच नुकसान झाले असून ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.पावसाने कापसाच्या बोन्डात लाल अळ्या पडलेल्या दिसत आहे. ज्वारी व मक्याला कोंब फुटले. अनेक ठिकाणी कापसाचे पीक पावसाने आडवे पडले. नुकसानग्रस्त शेतकºयांच्या पिकांचा शासनाने पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने कांग नदी दुथडी भरून वाहत होती.येथील शास्त्रीनगर व बिस्मील्ला नगरमधील काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने रहिवाशांचे नुकसान झाले. जुन्या बोदवड नाक्यावरुन अंजुमन शाळेकडे जाणाºया रस्त्यावरील गल्हाटी नाल्याला पूर आला. फरशीवरुन पाणी वाहत असल्याने या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली होती.
जामनेरला पावसाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2019 9:52 PM