लोकमत न्यूज नेटवर्क
धरणगाव : शहरात भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या जनआक्रोश हंडा मोर्चाने शहर परिसर दणाणून गेले. यावेळी मडके फोडून संताप व्यक्त करण्यात आला. हा जनआक्रोश हंडा मोर्चा बालाजी मंदिरापासून भाजपतर्फे नगरपालिकेवर काढण्यात आला.
मोर्चात संतप्त महिला, नागरीक अबालवृद्ध शेकडोंच्या संख्येने हंडा व मडक्यासह सहभागी होऊन पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आणि सत्ताधारी शिवसेना नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. नगरपालिकेत मोर्चा येताच संतप्त नागरीकांनी नगरपालिकेत मडके फोडून संताप व्यक्त केला. शेवटी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. गटनेते कैलास माळी यांनी पाणीपुरवठा सुरळीत होत नसेल, तर राजीनामे देऊन खुर्च्या खाली करा, असे आपल्या भाषणात सांगितले. त्यानंतर मधुकर रोकडे यांनी लोकांच्या तोंडचे पाणी हिसकवून रस्ते, गटर, ढापे बनवून भ्रष्टाचार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना इथेच भरावे लागेल, असे सांगितले. तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील यांनी पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा निषेध व्यक्त केला.
त्यानंतर भाजप नेते संजय महाजन यांनी २० वर्षात वेळोवेळी पाण्याचे आश्वासन देऊन गुलाबराव पाटील आमदारचे नामदार झाले, तरी धरणगावातील पाण्याची समस्या सोडवू शकत नसेल तर येत्या काळात यापेक्षाही मोठा हल्लाबोल मोर्चा काढण्यात येईल, असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले. गुलाब मराठे यांनी सूत्रसंचालन केले तर वसंतराव भोलाने यांनी निषेध व्यक्त करत आभार मानले.
मोर्चात शिरीष बयस, प्रकाश सोनवणे, शेखर पाटील, पुनिलाल महाजन, शहराध्यक्ष दिलीप महाजन, नगरसेवक शरद कंखरे, ललित येवले, भालचंद्र माळी, संगीता मराठे, शोभा राजपुत, कड़ु बयस, महिला अध्यक्ष प्रमिला रोकडे, माजी नगरसेविका चंद्रकला भोलाने, कल्पना महाजन, भास्कर मराठे, सुनिल चौधरी, राजेंद्र महाजन, संजय पाटील, योगेश ठाकरे, सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, सचिन पाटील, आनंद वाजपेयी, हितेश पटेल, प्रल्हाद पाटील, विजय महाजन, अमोल कासार, जुलाल भोई, संजय कोठारी, किशोर चौधरी, भूषण कंखरे, किशोर माळी, निलेश माळी, डोंगर चौधरी, शरद भोई, एकनाथ पाटील, अनिल महाजन, योगेश महाजन, आनंदा धनगर उपस्थित होते.