चुडामण बोरसे / ऑनलाईन लोकमत
जळगाव, दि. 27- वीर ओळखावा रणांगणी , साधू ओळखावा मरणी.. आणि कर्ता ओळखावा कर्मकरणी.. संत नामदेव महाराजांच्या याच संतवचनाचा अनुभव जानवे ता. अमळनेर येथे दगडू बोरसे यांच्या अंत्ययात्रेत अनुभवास आला. गावातील लोकांनी अंत्ययात्रेसाठी वर्गणी गोळा केली आणि फटाके फोडून वाजत- गाजत अंत्ययात्रा नव्हे तर आनंदयात्रा काढत..बहिराम महाराजांच्या या भक्ताला अखेरचा निरोप दिला. जानवे गावात एवढ्या प्रचंड प्रमाणात निघालेली ही पहिलीच अंत्ययात्रा होती.. असे अलौकीक भाग्य कमी लोकांच्या नशिबी येत असते.. हभप दगडू शंकर बोरसे (65) यांचे शनिवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे जाणे सर्वांनाच चटका लावून गेले. गावातील एक चालते- बोलते व्यक्तीमत्व. कुणाच्याही मदतीला धावून जाणारे.. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असो त्यात दगडू बोरसे नाहीत, असे होणार नाही. वयाच्या 20 व्या वषार्पासून ते पंढरपूरची पायी दिंडी करीत आले. अनेक आजारांवर ते लोकांना औषधी देत असत.. घरी आर्थिक स्थिती जेमतेम..सलूनचा व्यवसाय करीत पण कुणाकडून कधीच अपेक्षा केली नाही. विठ्ठल मंदिर उभारणीत त्यांचा पुढाकार होता. या निस्वार्थ भावनेमुळे जानवे आणि परिसरात दगा नाना म्हणून त्यांना ओळख मिळाली. गेल्या काही वषार्पूर्वी तत्कालीन सरपंच शिवाजीराव पाटील यांनी गावासाठी प्रवेशद्वार बनविले. सरपंचांनी दगडू बोरसे यांच्या हस्ते या प्रवेशद्वाराचे लोकार्पण केले होते, या आठवणींना उजाळा मिळाला. रविवारी दुपारी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. गावातील लोकांनी वर्गणी करीत हा खर्च करण्याचा निर्णय घेतला.. बघता बघता बरीच रक्कम जमा झाली. अंत्ययात्रेच्यावेळी गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. सारा गाव त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाला होता. फटाके फोडून आणि वाजत- गाजत त्यांची अंत्ययात्रा निघाली. ठिकठिकाणी महिलांनी या हरिच्या सेवकाची आरती केली. बहिरम महाराज की जय आणि दगा नाना की जय.. च्या घोषात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ सोमवार 22 पासून गावातील विठ्ठल मंदिराच्या आवारात दहा दिवस कीर्तन सप्ताहाचे आयोजन ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.