जळगाव : जवाहर नवोदय विद्यालयाची निवड चाचणी परीक्षा १० एप्रिल रोजी होणार होती़. परंतु, प्रशासकीय कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही परीक्षा रविवार, १६ मे रोजी होणार आहे.
भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील केंद्र सरकार संचलित जवाहर नवोदय विद्यालयामध्ये सहावीसाठी प्रवेश घेण्यासाठी दरवर्षी निवड चाचणी परीक्षेचे आयोजन केले जाते. यंदा ही परीक्षा १० एप्रिल रोजी नियोजित करण्यात आली होती. विद्यालयातील ८० जागांसाठी ही परीक्षा होणार असल्यामुळे जिल्हाभरातून पाचवीच्या विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. दरम्यान, काही दिवसांवर परीक्षा असताना, प्रशासकीय कारण सांगत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. आता १६ मे रोजी ही निवड चाचणी परीक्षा होणार आहे.
११ हजार ७९० परीक्षार्थी
नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज मागविले होते़. जिल्हाभरातून ११ हजार ७९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज केले आहेत. दरम्यान, परीक्षेचे प्रवेशपत्र ‘नवोदय’च्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षेच्या तीन आठवड्यांपूर्वीच प्रवेशपत्र डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ही निवड चाचणी परीक्षा जिल्ह्यातील ३१ केंद्रांवर होणार असल्याची माहिती नवोदय विद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. खंडारे यांनी दिली.