लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : मणिपूर (आसाम ) मधील सेनापती येथे झालेल्या भ्याड हल्ल्यात चाळीसगाव तालुक्यातील तांबोळा बुद्रुक येथील जवान सागर रामा धनगर (२२) हे शहीद झाले आहेत. ही घटना ३१ रोजी मध्यरात्री २ वाजता घडली. ही बातमी गावात कळताच परिसरात शोककळा पसरली आहे.
तीन वर्षांपूर्वी औरंगाबाद येथून वीर जवान सागर रामा धनगर हे सैन्यदलात भरती झाले होते. बेळगाव (कर्नाटक) येथून एक वर्षाची खडतर सैन्य प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची पोस्टिंग दिल्ली येथे करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वीच त्यांची बदली मणिपूर (आसाम) येथे झाली होती. जवान सागर धनगर हे आपले कर्तव्य बजावत असताना त्यांना गोळी लागून ते शहीद झाले आहेत.
वीर जवान सागर यांच्या पश्चात आई व एक मोठा भाऊ आहे. सागर हे लहान असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या आईने लोकांकडे मोलमजुरी करून दोघां मुलांचे संगोपन केले होते. आईच्या कष्टाचे चीज व्हावे, म्हणून कठोर परिश्रम करून वीर जवान सागर धनगर हे सैन्य दलात नोकरीला लागले होते. या घटनेने तांबोळे गावासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सागर धनगर हे नोव्हेंबर, २०१७मध्ये ५, मराठा इन्फ्रंटी बटालियनमध्ये रुजू झाले होते. वीरजवान सागर यांचे पार्थिव १ फेब्रुवारी रोजी दुपारी २.१० वाजता इंम्फाळ (मणिपूर) येथून गुवाहाटी (आसाम) येथे आणण्यात येणार आहे. तेथून ते दुपारी साडेतीन वाजता मुंबई येथील विमानतळावर सांयकाळी सव्वासात पोहचेल. व त्यांनतर ते मंगळवार दि. २ रोजी तांबोळा येथे मुळगावी आणण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे.