जयाचेनी नामे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।
ज्याच्या नामस्मरणाने मोठमोठी पातके नाश पावतात. उदाहरणार्थ- अनामेश आणि वाल्मीक ही साधके भगवंताच्या म्हणजे रामाच्या नामाने जगमान्य झाली. अशा प्रभू रामाच्या नावाने पुण्यसंचय होतो. वर्तमान स्थितीमध्येसुद्धा आपल्यासारख्या जिवांच्या हातात काहीच राहिले नाही. म्हणून निसर्गाच्या प्रकोपापुढे दुसरा उपाय नाही. सद्य:स्थितीला राम नवरात्र चालू आहे. अशा पावन पर्वावर प्रभूंच्या नामाने अंतरिक श्रद्धा जागवून घ्या. आपले धैर्य रामनामाने वाढवा.
समर्थ श्लोकात आपल्या मनाला बळ देत म्हणतात, की अशा प्रभूच्या नावाने साधकांचा पुण्यसंचय वाढतो. साधक मनाने धैर्यवान होऊन पुण्यसंचय होतो. साधक सत्त्वशील सदाचरण करतो. साधक सत्यचरणाने वागायला सुरुवात झाली की, साधकाच्या अंगी आपोआप सामर्थ्य येऊ लागते. कारण, सर्व व्रतांमध्ये सत्य वागणे, सत्य बोलणे, सत्याची साथ न सोडणे, न्यायाने वागणे हे व्रत फार मोठे आहे. मग सत्याने वागणाऱ्या साधकाच्या अंगी सामर्थ्य, धैर्य येते. त्या साधकाचे मनोबल एकदम उंचावून जाते.
रिद्धी-सिद्धी सर्व त्या साधकाजवळ येतात व अशा सत्य वागणाऱ्या साधकाने जर भगवंताचे नाव घेतले, तर त्या साधकाचे दोष जातात. त्या साधकाला पुण्यसंचय प्राप्त होतो. म्हणून समर्थ म्हणतात की, असे नाम आमच्या मुखात आहे.
म्हणून रामाचे स्मरण सकाळी करावे. सगळ्या कामांच्या अगोदर रामाचे स्मरण करावे. ‘राम राम समीर आधी, काळ घालावा तो मुरवनडी’ म्हणून रामाचे स्मरण करून आपल्याला कळी काळावर मात करता येते. म्हणून समर्थ प्रभातसमयी रामाचे चिंतन करायला सांगतात.
निरूपण : ह.भ.प. ऋषिकेश महाराज जोशी