रावेर : तालुक्यातील निरूळ गावी पोटच्या मुलानेच घरफोडी करून लंपास केलेले जन्मदात्री आईचे ६५ हजार रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम २० हजार रुपयांसह ८५ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करून पोलीसांनी आरोपी मुलाला अटक केली होती.
दरम्यान, रावेर न्यायालयाने पारीत केलेल्या आदेशान्वये सोमवारी पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक व फौजदार मनोहर जाधव यांनी हा मुद्देमाल त्या जन्मदात्री मातेच्या स्वाधीन केल्याने या मातेच्या डोळ्यातून तरळलेले आनंदाश्रू रावेर पोलीसांच्या चांगल्या कामाची पावती असल्याची भावना पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी व्यक्त केली आहे.
रावेर पोलीस स्टेशनचे हद्दीत येणाऱ्या निरूळ गावातील सयाबाई योगराज खैरे (५०) यांच्या घरात दि १५ डिसेंबर २०२० रोजी रात्री घरफोडी झाली होती. घरातील रोख २० हजार रुपये, ३५ हजार रुपये किमतीची ७ ग्रॅमची सोन्याची अंगठी, ३० हजार रुपये किमतीच्या चांदीच्या दोन पाटल्या व एक चांदीचे कडे असा एकूण ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेल्याची फिर्याद दिल्यावरून रावेर पोलीसात गुन्हा दाखल झाला होता.
पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शन खाली फौजदार मनोहर जाधव, पोलिस जगदीश पाटील, महेंद्र सुरवाडे, प्रमोद पाटील, सुरेश मेढे, सुकेश तडवी, महेश मोगरे, कुणाल सोनवणे, विशाल पाटील, प्रमोद पाटील या पोलीस पथकाने गोपनीय बतमीवरून जितेंद्र योगराज खैरे यास ताब्यात घेऊन हा गुन्हा उघडकीस आणला व चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत केला होता.
हा मुद्देमाल फिर्यादीस परत करण्यासंदर्भात रावेर न्यायालयातील दिवाणी न्यायाधीश आर. एल. राठोड यांनी आदेश पारीत केल्याने रोख २० हजार रुपये व ६५ हजार रु किमतीची सोन्या चांदीचे दागिने पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी त्या जन्मदात्री मातेला परत केल्याने तिच्या चेहर्यावर समाधान तरळल्याचे पाहून पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक व फौजदार मनोहर जाधव यांनाही धन्यता वाटली.