लोकमत न्यूज नेटवर्क
मुक्ताईनगर : वैकुंठी लक्ष घंटा वाजती एक घाई l
झाली मुक्ताबाई स्वरुपाकार l
असा जयजयकार करीत संत मुक्ताबाई पालखीचे सोमवारी जुन्या मंदिरातून नव्या मंदिरात प्रस्थान झाले. "कोरोना महामारी चे सावट जगा वरून जाऊदे शेतकऱ्यांना बळ मिळूदे" असे साकडे मुक्ताईचरणी घालण्यात आले.
आषाढी वारीसाठी ३० दिवस आधी मुक्ताई पालखीचे नियमाप्रमाणे सोमवारी सकाळी प्रस्थान झाले. राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी कोथळी येथील संत मुक्ताबाई मूर्ती व पालखीचे पूजन केले. ही पालखी येत्या १८ जुलैपर्यंत मुक्ताईनगर येथील नवीन मुक्ताई मंदिरात मुक्कामी थांबणार आहे.
वारी हा संस्कार सोहळा आहे. भक्ती, शिस्त व शक्तीचे चालते - बोलते विद्यापीठ म्हणजे वारी असल्याची भावना मंत्री पाटील यांनी व्यक्त केली.मान्यवरांनी धरला ठेका टाळमृदुंगाच्या गजरात पालखी सोहळा प्रस्थानप्रसंगी मंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार चंद्रकांत पाटील, संस्थानचे अध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, ॲड. रोहिणी खडसे -खेवलकर, रवींद्र हरणे महाराज यांनी टाळमृदुंगाच्या गजरात ठेका धरला. तीर्थक्षेत्र व पर्यटन विभागाच्या माध्यमातून मुक्ताई मंदिर परिसराला ११० कोटी रुपयांच्या कामांना तत्त्वतः मंजुरी मिळाली असून त्यात त्यातील बहुतांशी कामे ही पूर्ण झाली असल्याचे खडसे यांनी सांगितले.
यावेळी पंचायत समिती सभापती सुवर्णा साळुंखे, राकॉ. तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, राष्ट्रवादीचे सरचिटणीस ईश्वर रहाणे ,विशाल महाराज खोले आदींची प्रमुख उपस्थिती होती. आभार उद्धव जुनारे महाराज यांनी मानले.