जळगाव : आनंदाचा क्षण एखाद्या अवचित झुळकेसारखा असतो. तो निर्मळ, निखळ आणि नितळ असतो. नि:शब्दही असतो. हा भाव ह्दयात ठसला की मुक्या भावनांनाही वाचता येतात. तेव्हा पाझरते सह्दयी प्रेम आणि मग भरते दातृत्वाची शाळा....अगदी तृप्तीचा गारवा पेरणारी...जीत इंद्राची मन जिंकणारी....
जितेंद्र चंपालाल कांकरिया यांचे दातृत्व पुराण. रखरखत्या उन्हात पशुपक्षी पाण्याचा शोध घेतात. अनेकदा पाण्याअभावी ते तडफडून मरतातही. अशीच एक घटना बघितली आणि जितेंद्र यांनी पशुपक्ष्यांसाठी उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून ३०० बडगे वाटप करायला सुरुवात केली. १५ वर्षांपासूनचा हा प्रवास आजही उमेदीने सुरु आहे.तशातच रस्त्यावर भटकणाऱ्या जनावरेही पाण्याचा शोध घेत फिरताना त्यांना दिसली. तेव्हा त्यांनी शहरात सहाठिकाणी सिमेंटची मोठी भांड्यांच्या मांडणी केली आणि त्यात दररोज पाण्याची सोय करण्यासाठी जबाबदारीही निश्चीत केली. मायादेवीनगर, सिंधी कॉलनी, आकाशवाणी चौक, गांधीनगर, चर्चसमोर आणि रिंगरोडवर भटकणाऱ्या जनावरांना आता जलतृप्तीचा आनंद घेता येत आहे.
श्वानांसाठी चपात्या पेरल्या
कोरोनाकाळात लॉकडाऊन असल्यामुळे शहरातील हजारो श्वानांवर उपाशी राहण्याची वेळ आली. शिवाजीनगरात काही श्वान उपाशीपोटामुळे जीव गमावून बसले. तेव्हा जितेंद्र कांकरिया यांच्याकडे काही जणांनी मदत मागितली. तेव्हा त्यांनी त्यांच्या हॉटेलमध्ये दररोज हजारो चपात्या तयार करायला सुरुवात केली. मेहरुण, शिवाजीनगर, बसस्थानकासह अन्य भागात श्वानांसाठी चपात्या पोहोच करण्यासाठी ते स्वत: सरसावले. त्यामुळे भटक्या श्वानांना ‘एक घास सुखाचा’ अनुभवता आला.
रुग्णांसाठी दूध उपलब्ध
ग्रामीण भागातून येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. बहुतांशी दवाखाने भास्कर मार्केट परिसरात आहेत. अनेक रुग्ण दूधासाठी वणवण भटकतो. चहा दुकानावर दूधासाठी पैसेही मोजावे लागतात. तेव्हा कांकरिया यांनी रुग्णांसाठी दूधाची सोय केली. मागेल तितके दूध गरम करुन ते रुग्णांना पुरवित आहेत. तेही विनामुल्य...अमृततुल्य...मूक वेदना वेचण्यातला आनंद खूपच सुखदायी आहे. त्यासाठी अनेक जण मदतही करतात. त्यामुळे हा प्रवास निरंतरपणे सुरु असणार आहे.-जितेंद्र कांकरिया, सामाजिक कार्यकर्ते.