गोधनाच्या जीवामृताने फुंकले शेतीत प्राण
By admin | Published: September 11, 2015 9:37 PM
गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गो:हे, दूध, गोमूत्र, शेण मिळते. गाय ही शेतक:यांचे श्रद्धास्थान आहे.
देशातील शेतीला साडेदहा हजार वर्षाचा इतिहास आहे. शेतीचे अभ्यासक, जुने जाणते व संशोधक यांच्यानुसार पूर्वीची शेती ही स्थलांतरित होती. म्हणजेच एका ठिकाणी दोन ते तीन वर्षे शेती केली जायची. जमिनीची ताकद कमी झाली की नंतर जंगल कापून दुस:या ठिकाणावर शेती करायला समूहाने लोक जायचे. अजूनही हिमालय आणि सह्याद्रीत अशा पद्धतीची शेती करतात. पूर्वी शेणखताशिवाय शेती कुणी करीत नसते. खंडीभर गायी (20 गायी) पाळण्याचा प्रघातच होता. शेतात शेणखताचा वापर करणारा भगवान श्रीकृष्ण पहिला व्यक्ती होता, असेही तज्ज्ञांच्या भाषणात, लिखाणात येते. गायींच्या माध्यमातून शेती कसण्यासाठी गो:हे, दूध, गोमूत्र, शेण मिळते. गाय ही शेतक:यांचे श्रद्धास्थान आहे. राज्यात खान्देशात निमाली, मराठवाडय़ात लाल कंधारी, विदर्भात गवळाऊ, पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार, तसेच कांकरेज, गीर आदी जातीच्या गायी आहेत. तर देशात गायींच्या 36 जाती आहेत. विश्वासराव पाटील, जगन्नाथ धनसिंग पाटील यांच्यासारखे अनेक शेतकरी विविध जातींच्या गायींचे जतन करीत आहेत. सणासुदीला गायीची आवजरून दारासमोर पूजा केली जाते, तिला गोडधोड खाऊ घातले जाते. परंतु पुरातन शेती ही आज संयुक्तिक आहे का, हा प्रश्न पडतो. कारण गायींची संख्या झपाटय़ाने कमी झाली आहे. यामागे शेतमजुरी महागणे, नैसर्गिक आपत्ती, शेतमालाचे कोसळणारे भाव, शेती करण्याबाबतची युवक, महिलांमधील अनास्था अशी अनेक कारणे आहेत. पण आजही पुरातन शेती करण्याचे धाडस काही शेतकरी करतात. काही शेतकरी आवजरून शेतात दरवर्षी एकरी 30, 40 ते 50 बैलगाडय़ा गायीचे शेणखत टाकतात. यात दरवर्षी एकरी 18 बैलगाडय़ा गायीचे शेणखत म्हणजेच नऊ टन शेणखत टाकले तर पिकांबाबत अपेक्षित स्थिती निर्माण होते, असा अनुभव शेतकरी सांगतात. नैसर्गिक शेतीच्या प्रणेत्यानुसार एकरी नऊ टन शेणखत टाकायचे असले तर प्रत्येक शेतक:याकडे 10 देशी गायी असायला हव्यात, असा सरळ हिशोब लावता येईल. देशात 45 कोटी एकर शेती आहे म्हणजेच शेणखत मिळून पिके जोमात यावीत, शेतक:यांना अपेक्षित यश मिळावे यासाठी 450 कोटी देशी गायी देशात असणे आवश्यक आहे. परंतु देशात आजघडीला फक्त आठ कोटी देशी व इतर गायी आहेत. अनेक शेतकरी देशी काय, इतर गायींचे शेणखत दरवर्षी घेऊ शकत नाहीत. आज देशी गायींचे शेणखत मुबलक प्रमाणात मिळत नसले तरी देशी गायींच्या माध्यमातून मिळणारे गोमूत्र, शेण याद्वारे नैसर्गिक शेती करता येते. ङिारो बजेट शेती म्हणूनही ही शेती आता परिचित झाली आहे. देशी गायीच्या एक गॅ्रम शेणात 300 ग्रॅम जिवाणू असतात हे प्रयोगशाळेत सिद्ध झाले आहे. बेलोर ता.नांदगाव जि.अमरावती येथे नैसर्गिक शेतीचे प्रणेते सुभाष पाळेकर एका गायीच्या माध्यमातून 30 एकर बागायती शेती करतात. एक हजार किलो गायीचे शेण ते महिन्याला एक एकर शेतात टाकतात, तर पंधरवडय़ात किंवा गरजेनुसार 200 लीटर पाण्यात 10 किलो गायीचे शेण, 10 किलो गोमूत्र, एक किलो गूळ, एक किलो बेसन आणि प्रमाण लक्षात घेऊन बांधावरची माती टाकून ते मिश्रण तयार करतात. ते 48 तास आंबवतात. या मिश्रणास जीवामृत असे नाव देण्यात आले आहे. ते थेट झाडांना टाकले जाते. शेतात एक दाणाही रासायनिक खत न टाकता बागायती, फळबागांची शेती यशस्वी करण्याची किमया पाळेकरांसह जिल्ह्यात सतीश काटे, विलास सनेर, ईश्वर जाधव आदी शेतकरी करीत आहेत. विशेष म्हणजे जेवढे उत्पादन रासायनिक शेती देते, तेवढेच उत्पादन नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून मिळते. शिवाय या शेतीतून मिळणारा शेतमाल हा विष किंवा रसायनमुक्त राहत असल्याने त्याला बाजारपेठही उपलब्ध झाली आहे. या शेतमालास भावही अधिक मिळतो. याचा अर्थ आपल्या कृषी संस्कृतीत गायीचे जेवढे महत्त्व आहे तेवढे इतर घटकांचे नाही हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. -चंद्रकांत जाधव, जळगाव