जळगाव : शिक्षक म्हणून नियुक्ती मिळवण्यासाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा वेळेत उत्तीर्ण न केल्याने किंवा अनुत्तीर्ण झाल्याने जळगाव जिल्ह्यातील सुमारे ६० शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
राज्यात मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमाच्या तरतुदीनुसार टीईटी उत्तीर्ण उमेदवारच शिक्षक होण्यासाठी पात्र आहे. या नव्या नियमावलीची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारने टीईटी परीक्षा शिक्षक होण्यासाठी बंधनकारक केली आहे. असे असले तरी काही खासगी शिक्षक संस्थांनी शाळांमध्ये टीईटी नसलेल्या शिक्षकांना नियुक्ती केली आहे. दरम्यान, या शिक्षकांनी टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी राज्य शासनाने मुदतही दिली होती. मात्र निर्धारित मुदतीमध्ये या शिक्षकांनी टीईटी पास केली नाही. परिणामी नुकत्याच लागलेल्या न्यायालयाच्या निर्णयानुसार या शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यात एकूण २६ हजार ६९७ शिक्षक आहेत. त्यामध्ये अनुदानित शाळांमधील १३ हजार ९०५, तर विनाअनुदानित शाळांमधील एक हजार ३३३ शिक्षकांचा समावेश आहे. दरम्यान, ६० शिक्षकांकडे टीईटी नसल्यामुळे त्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. अशा शिक्षकांचे आधीच शिक्षण विभागाने वेतन रोखले आहे.