लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या १९ व्या बालगंधर्व संगीत महोत्सवात शुक्रवारी सायंकाळी ओंकार दादरकर यांनी आपल्या सुरांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी शेवटी संत कान्होपात्रा या नाटकातील बालगंधर्व यांचे पद ‘जोहार मायबाप जोहार’ हे पद सादर करून रसिकांची मने जिंकली.
शनिवारी छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात बालगंधर्व संगित महोत्सवाला ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाने सुरूवात झाली. त्यात राग शाम कल्याणमध्ये विलंबीत रुपक तालातील म्हारा रसिया बंदिश सादर केली. त्यानंतर सावन की सांज ही मध्य लय तीन तालातील बंदीश सादर केली. त्यानंतर द्रुत एक तालातील बंदिश सादर केली. त्यांनी विदुषी कै. गिरीजा देवी यांची स्वर रचना असलेल्या तुम बिन नींद ना ही मिश्र किरवाणी रागातील ठुमरी सादर केली. त्यानंतर त्यांनी नामदेव महाराजांचे शब्द आणि पंडित श्रीनिवास खळे यांची स्वररचना असलेला काळ देहासी हा अभंग सादर केला. पहिल्या सत्राची अखेर त्यांनी संत चोखामेळा यांची शब्द रचना असलेले जोहार माय बाप जोहार हे पद गाऊन केली. तबल्यावर साथ चारुदत्त फडके तर संवादिनीवर मिलींद कुलकर्णी यांनी साथ दिली. तानपुरावर वरुण नेवे आणि मयूर पाटील यांनी साथ दिली.
त्यानंतर दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडीत,स्टेट बँकेचे उपमहाव्यवस्थापक एस.विठ्ठल रंगम, शाखा व्यवस्थापक दिनेश दत्ता, जगन्नाथ वाणी, डॉ. विवेकानंद कुलकर्णी, दीपक चांदोरकर, अरविंद देशपांडे उपस्थित होते.
कलावंत परिचय
गोटीपुवा समुह नृत्य
रघुराजपूर येथील किशोर अवस्थेतील लहान मुले गोटीपुुवा या समुह नृत्याचे सादरीकरण करणार आहेत. हा ओडिसी नृत्य प्रकार आहे. हे नृत्य सहा किंवा दहा सदस्यांच्या समुहात सादर केले जाते. नृत्याच्या साथसंगतीत पारंपरीक वाद्यवृंदाचा असो. पारंपरीक पद्धतीने त्याचे सादरीकरण होते. यात मरडाला, संवादिनी, बासरी, व्हायोली या वाद्यांच्या सहाय्याने नृत्य प्रकाराचे सादरीकरण होते.
सुश्री मोहंती
भुवनेश्वर येथील सुश्री मोहंती या भुवनेश्वर मध्ये वकिली करतात. ओडिसी नृत्याचे त्यांचे पहिले गुरू श्री दुर्गा चरण रणबीर आणि देबा प्रसाद दास हे आहेत. संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार या दोन महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. १५ वर्षांपासून त्या लोकनृत्यगुरू म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी अनेक ओडिसी नृत्य व लोकनृत्य तसेच दंड नृत्य यांचे दिग्दर्शन देखील केले आहे. पश्चिम कलाकेंद्र चंदीगड येथून त्यांची नृत्य भास्कर ही पदवी प्राप्त केली.
आम्ही दुनियेचे राजे एक संगितिका
मराठी चित्रपट संगिताची पहिली पाच दशके म्हणजे १९१० ते १९६० या कालखंडातील दिग्गज संगीतकारांच्या सुवर्ण काळाचा वेध घेणारा संगीत नाट्यानुभव म्हणजे ‘आम्ही दुनियेचे राजे’. या कार्यक्रमाचे दिग्दर्शन देवेंद्र भोमे यांनी जुन्या गाण्यांच्या चाली तशाच ठेऊन पुन्हा नव्याने संगितबद्ध केले आहेत. अभिजीत खांडकेकर आणि गौतमी देशपांडे हे या कार्यक्रमाचे निवेदन करणार आहेत. यात जयदीप वैद्य, आशुतोश मुंगळे, श्रृती आठवले, मुक्ता जोशी, केतन पवार, देवेंद्र भोमे यांचा समावेश आहे.