जळगाव : कोरोना विषाणू संसर्गाचा जिल्ह्यात आतापर्यंत एकही संशयीत रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. मात्र प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ नंदकुमार बेडसे यांनी जिल्ह्यातील नागरीकांना केले आहे.कोरोना विषाणूबाबत राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर अपर जिल्हाधिकारी डॉ. बेडसे यांनी उपस्थितांना सूचना केल्यात. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, उपजिल्हाधिकारी (महसुल) रवींद्र चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नरवीर रावळ यांच्यासह जिल्हा परिषद, महानगरपालिका व आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.डॉ. बेडसे म्हणाले की, जिल्ह्यातील ट्रॅव्हल कंपन्यांनी तूर्त परदेशी यात्रांचे बुकींग करु नये. तसेच आपल्या कंपनीमार्फत पर्यटनासाठी परदेशात गेलेल्या नागरीकांची माहिती, ते परत कधी येणार याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी, जळगाव विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांची माहिती विमान प्राधिकरणाकडून घेण्यात यावी, तसेच लक्षणांनुसार उपचार घेणाºया रुग्णांना रोग प्रतिकार शक्ती वाढविण्याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शन करण्याचे आवाहनही डॉ. बेडसे यांनी केले.
जळगाव जिल्ह्यात ‘कोरोना’चा एकही रुग्ण नाही, भीती न बाळगण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 12:21 PM