चुंचाळे, ता.यावल, जि.जळगाव : तालुक्यातील साकळी येथील श्री सच्चिदानंद स्वरूप बहुउद्देशीय संस्था संचलित श्री संत गजानन महाराज फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित साकळी ते शेगाव पदयात्रेचा शुभारंभ ५ रोजी उत्साहात झाला. ही यात्रा गेल्या नऊ वर्षांपासून सुरू आहे.सुरुवातीला मनवेल रोडवरील जोशी फार्मवरील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिरात विधीवत अभिषेक व महाआरती करण्यात आली. यानंतर पदयात्रेला सुरुवात होऊन तिचे साकळी गावात आगमन झाले. यात्रेदरम्यान संपूर्ण यात्रा मार्गावर शारदा विद्यामंदिर शाळेपासून ते नेवे-वाणी गल्लीच्या कोपऱ्यापर्यंत स्वागतासाठी रांगोळ्या काढण्यात आलेल्या होत्या.वारकरी संप्रदायानुसार विविध अभंग गाऊन तसेच महाराजांचा जयघोष करून यात्रा मार्गस्थ होत होती. गावात पदयात्रींवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली. अतिशय मंगलमय वातावरणात चाललेल्या पदयात्रेचे स्वरूप पाहून भक्तांना एक धार्मिक आत्मतृप्ती होत असल्याची अनुभूती येत होती. पदयात्रेत शेकडो तरुण व मध्यमवयीन भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.यादरम्यान हनुमान पेठेतील श्री हनुमान मंदिराजवळ श्याम महाजन मित्र परिवारातर्फे तसेच शिरसाड येथील सरपंच गोटू सोनवणे व मित्र परिवार- ग्रामस्थांतर्फे भाविकांना चहापाणी व बिस्किटांचे वाटप करण्यात आले. यावल येथेही घोडेपीर बाबा दर्ग्याजवळ सारंग बेहेडे यांनी चहा पाण्याची व्यवस्था केली, तर रशीदबाबा आश्रमाचे गादीपती छोटू बाबा नेवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.ग्रामपंचायत सदस्य सय्यद अश्पाक सय्यद शौकत यांनीही यात्रेतील भाविकांचा सत्कार करून धार्मिक एकतेचे दर्शन घडविले.
साकळी ते शेगाव पदयात्रेला उत्साहात सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2020 4:24 PM