बांगला देशातील प्रवासात बरिसालच्या धक्क्याला आमची लाँच लागली. तो दिवस होता २९ जानेवारी २०१९. त्या दिवशी रात्री उशिरा पण छान झोप लागली होती. सकाळी पाहतो तो प्रवासी आंघोळी वगैरे सगळे आवरूनच लाँचमधून उतरत होते. शहरात जाऊन कुठेही लॉज शोधायची गरज नाही. फक्त गरम पाणी नव्हते आणि थंडी मात्र छानच होती. मी मार ऐटीत राहता यावे म्हणून जास्तीचे कपडे घेतले होते.रात्री लाँचवर बॅगा टेकवल्यावर ज्या गप्पा झाल्या त्यातून पुढच्या प्रवासाची थोडी कल्पना आली. पुढच्या प्रवासाची एकूण रूपरेषा पाहता जास्तीचे सामान तेथेच सोडून देणे शहाणपणाचे वाटल्याने एका बॅगेत लाँचवरच सोडून दिले. कारण हीच लाँच रात्री पुन्हा परतीच्या प्रवासाला निघते आणि आम्हाला घेऊन जाणार होती.बरिसालहून पुढे जाण्यासाठी आम्ही एक कार सांगून ठेवली होती. ‘आता आलोच’, ‘फक्त पाचच मिनिटे’, असे करत टॅक्सीवाला ६.३० वाजता आला. त्यात बसून आम्ही जवळपास दोन तासांनी ‘बिघाई’ नदीच्या उत्तर बाजूच्या किनारी थांबलो.हिचे पात्र मोठे आहे. ते आम्ही कारसह फेरीने ओलांडले. फेरीत ट्रक, बस, कार इ. सहीत माणसे जाऊ शकतात. आता तेथे मोठ्या पुलाचे काम सुरू आहे. दोन वर्षात हा पूल सुरू होईल. मग मात्र फेरीतून जाण्याची गरज राहणार नाही.फेरीतून साधारण २० मिनिटात आम्ही सकार बिघाई नदी ओलांडली आणि पुन्हा कारने प्रवास सुरू केला. एकूण साधारण ८० किलोमीटरच्या प्रवासानंतर कारने आम्हाला गालाचीपा (बं.उ. गॉलाचिपा) या नदीकिनारी सोडले. तेथून पुढे कार जाणे शक्य नव्हते. टॅक्सीवाला आम्ही परत येऊ तोपर्यंत तेथेच आमची वाट पाहणार होता.गालाचिपा नदीतून मोटरबोटने आम्ही फक्त नदी न ओलांडता साधारण पाऊणतासभर प्रवास करून दुसऱ्या किनाºयावर उतरलो, तर समोर ८/१० तरुण मोटारसायकल घेऊन उभे. कारण जमिनीवरच्या प्रवासासाठी येथे फक्त हाच पर्याय. लोक उतरतात तेथे हे तरुण मोटारसायकल घेऊन उभे असतात, टॅक्सी किंवा रिक्षा थांबतात, तसे. प्रत्येक मोटारसायकलवर एक प्रवासी घेऊन निघतात. दुसरे वाहनच नाही. हे सर्व रात्री लाँचवर माहीत झाल्याने मी एक बॅग लाँचवरच सोडून दिली ते बरेच झाले होते. येथे आम्ही मोटारसायकलने पुढचे साधारण १८ किलोमीटर गेलो आणि ‘तेतुलिया’ नदीकाठी पोहोचलो.तेतुलिया नदीतून पुढचा रंगबलीपर्यंतचा प्रवास अतिशय धोकादायक अशा भागातून खुल्या स्पीडबोटने केला. याच भागात नेहमी चक्रीवादळे तडाखा देत राहतात. शिवाय या भागात एकूण सात मोठ्या नद्या समोरच दिसणाºया बंगालच्या उपसागराला मिळतात. त्यामुळे हा भाग अक्षरश: सागरच वाटतो, इतके त्याचे पात्र विशाल आहे. नजर जाईल तिथवर पाणीच पाणी. त्यातल्या एका भागाचे नाव आहे ‘अगीन मुख’ (बं.उ. ‘अगुनमोखा’) म्हणजे ज्वालामुखीचे तोंड. कारण वादळे येतात तेव्हा हा भाग अतिशय राक्षसी होतो आणि खूप नुकसान करतो. त्यावर काहीही करताही येत नाही. त्यामुळे त्या भागाचे लोकांनी अतिशय समर्पक नाव ठेवले आहे. बंगालचा उपसागर समोरच दिसतो आणि कधी कधी त्याच्या मोठमोठ्या लाटा या भागापर्यंत येतात आणि नेहमी स्पीडबोटीचे अपघात होत असतात. म्हणूनच ‘अगुनमोखा’तून होणाºया माझ्या प्रवासाची चिंता तेथल्या लोकांना होती. खुल्या स्पीडबोटचा वेग बºयापैकी होता. त्यातून जवळपास पाऊण तास जाताना वेगामुळे भणाणलेला वारा अक्षरश: चक्कर आणतो. (क्रमश:)-सी.ए. अनिलकुमार शहा, जळगाव
अगुनमोखातून प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 3:00 PM