जळगाव- कोरोनाशी दोन हात करुन त्याला पिटाळून लावण्यासाठी आधी राज्यात आणि आत्ता देशाभरात लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. मात्र जे लोक निराधार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी घराबाहेर पडतात. जे पोलीस बांधव दिवसभर नागरिकांच्या सुरक्षेसाठी भर उन्हात रस्त्यांवर तैनात आहेत, अशांना बुधवारी शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मदतीचा हात देत फूड पॅकेट वाटप करण्यात आले. मंडळाच्या उपक्रमामुळे निराधारांच्या चेहºयावर आनंद फुलल्याचे दिसून आले.शहरात अत्यावश्यक सेवा वगळता काही एक सुरु नाही. अशा परिस्थितीत बुधवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांच्यासह किशोर भोसले, अजय गांधी, ललित चौधरी, धनंजय चौधरी, जगदीश जोशी, अमित भाटीया, प्रणव नेवे, भूषण शिंपी, सुरज दायमा यांनी प्रत्यक्ष शहरातील रेल्वेस्थानक, जिल्हा रूग्णालय, नवीन बसस्थानक यासह विविध भागात फिरून गोरगरिबांना फूड पॅकेट वाटप केले़ त्यात पुरी-भाजीचा समावेश होता़ बुधवारी सकाळी ११.३० वाजता फूड पॅकेट वाटपाला सुरूवात झाली़ बेघर, हातावर पोट असलेले नाका कामगार यांना पॉकेटस् वाटण्यात आले.पोलीस बांधवांनाही दिले जेवणकोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सरकारने घरात राहण्याचे आवाहन केले आहे़ मात्र, काही नागरिक अजूनही रस्त्यावर येत असल्यामुळे भर उन्हात पोलिसांना नागरिकांच्या सुरक्षेसाठी तैनात रहावे लागत आहे़. या पोलीस बांधवांनाही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे जेवण देण्यात आले़ कोरोनाला आळा घालण्यासाठी नागरिकांनी घरात थांबावे, असे आवाहन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे यांनी केले आहे.
उपाशीपोटी असलेल्यांच्या चेहऱ्यावर फुलविले आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2020 9:35 PM