जळगाव : गूळ मध्यम प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या जमिनीचा मोबदला मिळत नसल्याने प्रकल्पबाधीतांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. संध्याकाळी कार्यवाहीबाबत आश्वासन मिळाल्याने हे उपोषण मागे घेण्यात आले.या संदर्भात चोपडा तालुक्यातील आडगाव, विरवाडे, नरवाडे, वडजी, विष्णूपूर, वर्डी आदी गावातील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गूळ प्रकल्पासाठी २००९-२०१०मध्ये जमीन संपादीत करण्यात आली. मात्र त्याचा अद्यापही मोबदला मिळालेला नाही. यासाठी वारंवार पाठपुरावा केला तरी उपयोग होत नसल्याने उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला. निवेदनावर कैलास पांडुरंग पाटील, भगवान आनंदा पाटील, पंडित पाटील, सुनील पाटील, विजय पाटील आदींच्या सह्या आहेत.दरम्यान, या बाबत उपोषणकर्त्यांनी संध्याकाळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
गूळ प्रकल्प बाधीतांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:17 PM