भुसावळ : संपूर्ण देशभरात डॉक्टरांवर हल्ले झाल्याच्या घटना वाढल्या आहेत. देशभरातील डॉक्टरांवरील हिंसाचाराचा आयएमएतर्फे निषेध करण्यात येत आहे. सर्व समाजामध्ये याविषयी जनजागृती करण्यासाठी येत्या १८ जून रोजी आयएमए देशव्यापी पातळीवर निषेध दिन पाळणार आहे. या दिवशी सध्याची परिस्थिती विचारात घेऊन रुग्णसेवा बंद ठेवण्याचा विचार नाही. सनदशीर मार्गाने आम्ही निषेध नोंदवणार असल्याची माहिती आयएमएचे अध्यक्ष डॉ. धैर्यासागर राणे, सचिव डॉ. वीरेंद्र झांबरे यांनी दिली.
या दिवशी काळ्या फिती लावून, काळे मास्क लावून डाॅक्टर्स काम करणार आहेत. सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांना निवेदन देण्यात येईल. तसेच पंतप्रधानांना देशभरातून निवेदन पाठवणार असल्याचे आयएमएतर्फे कळविण्यात आले आहे.
या आहेत प्रमुख मागण्या...
डॉक्टरांवरील हिंसाचार रोखण्यासाठीचा केंद्रीय कायदा पारित करण्यात यावा. या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये तयार आहे. फक्त गृहमंत्रालयाच्या काही आक्षेपांमुळे तो कायदा पारित होण्यापासून थांबलेला आहे. तो त्वरित पारित करण्यात यावा. जेणेकरून आरोग्य व्यवस्थेवर हिंसाचार हा भारतीय दंडसंहितेच्या कक्षेत येईल. सर्व वैद्यकीय आस्थापना या संरक्षित क्षेत्र घोषित करण्यात याव्यात. रुग्णालयांच्या सुरक्षेचे प्रमाणिकरण करण्यात यावे. अशा हल्लेखोर व्यक्तींवरील खटले जलद न्यायालयात चालवावेत.
माध्यमांमध्ये याविषयी जनजागृती बऱ्यापैकी झालेली दिसत आहे. डाॅक्टरांनी आंदोलन केले तर, "डॉक्टर तुम्हीसुद्धा?" असं विचारणाऱ्या लोकांना आम्हाला फक्त असं सांगावंसं वाटतं की, होय, आम्ही डॉक्टरसुद्धा! आम्हीसुद्धा माणूस आहोत, आम्हालाही मन आहे, आम्हाला देवत्वाचा दर्जा बिलकुल नको, पण किमान एक मनुष्य म्हणून सुरक्षित आणि भयमुक्त वातावरणात आमचं काम आम्हाला करू द्या, एवढीच आमची मागणी आहे. त्यासाठीच हा १८ जूनचा निषेध दिन आहे, असे आयएमएने म्हटले आहे.