क्रीडा पुरस्कारांसाठी २१ जूनपर्यंत अर्ज
जळगाव : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय यांच्यामार्फत आंतरराष्ट्रीय खेळातील अतिउच्च कामगिरीबाबत राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार व या खेळांचा प्रचार-प्रसार व विकासात्मक कार्य करणाऱ्या संस्थांना राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात येतो. तसेच ध्यानचंद पुरस्कार व विद्यापीठांसाठी मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांकरिता नामनिर्देशांचे प्रस्ताव २१ जूनपर्यंत पाठवावेत, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित यांनी केले आहे.
दिव्यांग बांधवांसाठी आज लसीकरण
जळगाव : शहरातील ४५ वर्षे व त्यावरील दिव्यांग बांधवांसाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्यावतीने २९ मे रोजी विनाप्रतीक्षा, विनारांग लसीकरण करण्यात येत आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत इंडियन रेडक्रॉस सोसायटी येथे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन इंडियन रेडक्रॉस सोसायटी व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्यावतीने करण्यात आले आहे.
रस्त्यांची दुरवस्था
जळगाव : शहरातील विविध भागातील रस्त्यांची दुरवस्था बनल्याने वाहनधारक व शहरवासीय त्रस्त बनले आहेत. यात शाहूनगर भागातील रस्ता अत्यंत खराब बनला असून या ठिकाणी वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील रहिवासी व वाहनधारकांतर्फे करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जळगाव : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, नायब तहसीलदार रवींद्र मोरे, अमित भोईटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.