लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत झालेल्या ४ डिसेंबर रोजीच्या जलव्यवस्थापन समितीच्या सभेत बेशिस्त वर्तन केल्याचा ठपका ठेवत लघुसिंचन पाटबंधारे जामनेर उपविभागाचे कनिष्ठ अभियंता राधेश्याम सोनवणे यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी.एन. पाटील यांनी निलंबित केले आहे.
जलव्यवस्थापन समितीची ४ डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. जिल्हाभर गाजणाऱ्या गौण खनिज रॉयल्टी घोटाळ्याबाबत सदस्या पल्लवी सावकारे यांनी प्रश्न उपस्थित केला असता, कनिष्ठ अभियंता सोनवणे यांनी अचानक उठून या सभेत विरोध केला होता. यावेळी त्यांच्यावर सर्व सदस्यांनी संताप व्यक्त करीत त्यांच्या निलंबनाची मागणी केली होती. यावेळी सीईओ डॉ. पाटील यांनी सोनवणे यांना सभागृहाबाहेरही काढले होते. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी सोनवणे यांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले. निलंबन काळात त्यांना जलसंधारण उपविभाग चाळीसगाव हे मुख्यालय देण्यात आले आहे.
पंतप्रधानांकडे केली आहे तक्रार
कनिष्ठ अभियंता सोनवणे यांनी जलशक्ती अभियानातील निविदा प्रक्रियांमध्ये अनियमितता झाल्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार केलेली आहे. कामांचा तुलनात्मक अभ्यास केला असता संबंधित ठेकेदाराने ऑनलाइन जी कागदपत्रे सादर केलेली आहेत, त्या एकसारख्या कागदपत्रांच्या आधारे सोयीनुसार ते कधी पात्र तर कधी अपात्र ठरविण्यात आले आहेत. अशा प्रकारे शासनाची दिशाभूल करून आर्थिक नुकसान झालेले आहे, तरी सायबर क्राइमच्या माध्यमातून स्वत: या प्रकरणाची तपासणी करून कारवाई करावी, अशी मागणी सोनवणे यांनी तक्रारीत केलेली आहे. त्यांनी याला काही गोपनीय कागदपत्रे जोडलेली आहे.
बडतर्फ करण्याची मागणी
राधेश्याम सोनवणे यांनी केलेल्या या तक्रारीवरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. अधिकारीच तक्रारी करीत असून, अशा तक्रारींसाठी वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागते, शिवाय त्यांच्याकडे ही गोपनीय कागदपत्रे आली कोठून, असा सवाल उपस्थित करून सोनवणे यांना बडतर्फ करण्याची तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या पल्लवी सावकारे यांनी सीईओंकडे केलेली आहे.