जळगाव : जंकफूडकडे मुलांचा कल वाढत असल्याने त्यांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे पदार्थ मिळण्याचे ठिकाण म्हणजे महविद्यालयांचे कॅण्टीन असल्याने तेथील कॅण्टीनसह शाळा परिसरातून जंकफूड कायमस्वरुपी हद्दपार करण्याचा निर्णय आता अन्न व औषध प्रशासनाने घेतला आहे. महाविद्यालयांतील प्राचार्यांना तत्काळ नोटिसाही बजावण्यात येत आहेत.पूर्वी हॉटेलमध्ये शिरा, उपीट, मटकीची उसळ, पोळी भाजी, अशा प्रकारचे वेगवेगळे पदार्थ मिळत होते. खरंतर हे पदार्थ शरीरासाठी उपयुक्त असे होते. महाविद्यालय कॅण्टीनपासून सर्वच हॉटेलमध्ये हे पदार्थ सहजासहजी मिळत होते. परंतु अलीकडे स्पर्धेच्या चढाओढीत हॉटेलमध्ये पारंपरिक पदार्थांची जागा जंकफूडने घेतली. शिरा, उपीट यासारखे पदार्थ नाष्त्यासाठी मागणे हे हल्लीच्या मुलांना कमीपणाचे वाटू लागलेय. त्यामुळे चमचमीत असे पिज्झा, बर्गर, चिप्स, सामोसा, बटाट्याचे विविध पदार्थ अशा प्रकारचे जंकफूड पदार्थ खाणे युवक-युवती पसंत करत आहेत.जंकफूड आरोग्यासाठी अत्यंत घातक असतानाही याकडे दुर्लक्ष केले होत आहे.कर्करोगासारखा आजार जंकफूडच्या सेवनातून झपाट्याने वाढत असल्याचे वैद्यकीय निष्कर्षातून उघड झाले आहे. तरुण पिढी याला बळी पडत असल्याने अन्न व औषध प्रशासनाने ठोस भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयस शाळांच्या कॅॅण्टीनमध्ये यापुढे जंकफूड दिसणार नाही, यासाठी या विभागाने मोहीम उघडली आहे. यात विद्यार्थ्यांना सकस आहार उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्त पल्लवी दराडे यांनी उपक्रम हाती घेतला आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ३८८ महाविद्यालयाच्या प्राचार्य तसेच शाळेच्या मुख्याध्यापकांना अन्न व सुरक्षा मानद कायद्याचे पालन करून जंकफूडसारखा पदार्थ विक्रीस न ठेवण्याच्या सूचना कॅण्टीन चालकांना देण्याविषयीचे पत्र दिले आहे.दुसऱ्या टप्प्यामध्ये कॅण्टीनमध्ये अचानक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. हॉटेलमध्ये जंकफूड विक्रीस ठेवलेच नाही तर मुलांना त्याचे गांभीर्य समजेल आणि मुले जंकफूड खाण्यापासून परावृत्त होतील, हा उद्देश या पाठीमागचा असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शाळा-महाविद्यालय परिसरातही असलेल्या हॉटेल चालकांवर लक्ष ठेवले जाणार आहे. कॅण्टीनमध्ये स्वच्छतेबरोबरच अन्नपदार्थांचा दर्जा चांगला ठेवावा, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. गिºहाईक कमी झाले तरी चालेले; पण मुलांच्या आरोग्याशी खेळू नका, असे आवाहनही करण्यात येत आहे.शाळा, महाविद्यालयाच्या कॅण्टीनमध्ये जंकफूड विक्री केले जात आहे की नाही, हे पाहण्यासाठी अन्न व औषध प्रशासन पथकेदेखील तयार करणार असून ही पथके अचानक कॅण्टीनची तपासणी करणार आहेत. अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत कडक धोरण अवलंबले आहे.शाळा, महाविद्यालयाच्या कॅण्टीनमध्ये जंकफूड विक्रीस ठेवू नयेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी जिल्ह्यातील ३८८ शाळा, महाविद्यालयांचे प्राचार्य, मुख्याध्यापकांना पत्र देण्यात आले आहे.- वाय.के. बेंडकुळे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन
शाळा, महाविद्यालयांच्या कॅण्टीनमधून जंकफूड होणार हद्दपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 12:11 PM