मुक्ताईनगर : गेल्या ४० वर्षांपासून पक्षाने जो आदेश दिला त्याचे पालन केले. पक्षासाठी काही कटू निर्णय स्विकारले. पक्षाने आता आपल्या ऐवजी रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मला जे प्रेम दिले तेच रोहिणी यांना द्या असे आवाहन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी शुक्रवारी मुक्ताईनगरात केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करीत रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून भाजपाने पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे खडसे यांच्या बंडाच्या शक्यतेला पूर्णविराम मिळला आहे. रोहिणी खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन केलं. त्यापूर्वी बोलताना एकनाथ खडसे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.यावेळी खडसे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून आपल्या मतदारसंघामध्ये भाजपाचा उमेदवार कोण असेल, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. गेल्या तीस वर्षांपासून तुम्ही मला निवडून दिलं. पक्ष बदनाम होईल असं काम केलं नाही. त्यासाठी एका मिनिटात मंत्रीपद सोडल्याचे ते म्हणाले.माझी मुलगी म्हणून नाही तर पक्ष म्हणून साथ द्यामला उमेदवारी न देता रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. त्याला विलंब लागला तरी चांगला निर्णय घेतला आहे. घरासुद्धा अडचणी असतात. हा तर पक्ष आहे. त्यामुळे तिथे अडचणी असणारच. पण, तुमचं म्हणणं मी पक्ष श्रेष्ठींपर्यत पोहोचवले आहे. पक्षाच्या निर्णय आपल्या हिताचा आहे. माझी मुलगी म्हणून नाही. तर पक्षाची कार्यकर्ता म्हणून तिला साथ द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती.मुलगा मोठा झाला की बापाला निवृत्त व्हावे लागतेएकेकाळी तिकीट वाटपाबाबत आपण निर्णय घेत होते. आता मात्र आपलेच तिकिट कापले गेले, याबाबत एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने खडसे यांना छेडले असता ते म्हणाले की, मुलगा मोठा झाल्यावर त्याच्या पायात बापाचा बूट बसू लागला तर बापाला बऱ्याचदा निवृत्ती घ्यावी लागते. काळ बदलत असतो.
मला जे प्रेम दिले तेच रोहिणी यांना द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2019 7:50 PM