(डमी ९२६ )
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रावण सोमवार
पहिला - ९ ऑगस्ट
दुसरा - १६ ऑगस्ट
तिसरा -२३ ऑगस्ट
चौथा -३० ऑगस्ट
पाचवा - ६ सप्टेंबर
जळगाव : गेल्या दीड वर्षापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जनजीवनासह सण-उत्सवावरदेखील मोठा परिणाम झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण असल्याने श्रावण महिन्यातदेखील कोणतेही मंदिर उघडण्यात आले नव्हते. यावर्षी मात्र श्रावण महिन्यात मंदिर उघडण्यात येतील अशी अपेक्षा भक्तांना लागून आहे. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वैद्यकीय विभागातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात असल्याने श्रावण महिन्यात मंदिरं उघडण्याची शक्यता कमी आहे. त्यातच यावर्षी तब्बल २९ दिवसांचा श्रावण साजरा करता येणार आहे. मात्र, मंदिरे बंद असल्याने भाविकांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.
दरवर्षी भाविक श्रावण महिन्याची आतुरतेने वाट पाहतात काही व्रतवैकल्ये मंदिरांमधले केली जातात. मात्र, गतवर्षी कोरोनामुळे व्रतवैकल्य करता आली नाही. यावर्षी तरी मंदिरात प्रवेश मिळणार का? याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. जळगाव शहरात श्रावण काळात ओंकारेश्वर मंदिर, शिवधाम, नेरीनाका परिसरातील बारा ज्योर्तिलींग मंदिर या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यासह जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील नागेश्वर, अमळनेर तालुक्यातील कपिलेश्वर व जळगाव तालुक्यातील रामेश्वर येथेदेखील श्रावण सोमवारी भाविकांची गर्दी होत असते. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून ही मंदिरे बंद असल्याने या मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. यामुळे यंदा तरी श्रावण काळात मंदिरं उघडण्यात यावी अशी मागणी भाविक व मंदिर परिसरात पूजा-साहित्य विक्री करणाऱ्यांकडून केली जात आहे.
देवा आता अंत नको पाहू
गेल्या दीड वर्षापासून मंदिर बंद आहे. मंदिर सुरू राहते तर नारळ व काही पूजेचे साहित्य विक्री करून व्यवसाय केला जात असतो. मात्र, मंदिर बंद असल्याने हा व्यवसायदेखील बंद झाला आहे. आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. निदान श्रावण महिन्यापुरते तरी मंदिर उघडण्याचा निर्णय घ्यायला हवा.
- छाया माळी, फुल विक्रेत्या
श्रावण महिन्यात सोमवारसह इतर महत्त्वाचे सणदेखील येत असतात. या सण-उत्सवामुळे बाजारातदेखील मोठी उलाढाल होत असते. मात्र, या काळात जर मंदिरं बंद राहिली तर ही उलाढालदेखील होत नसते. यामुळे मोठा फटका आमच्यासारख्या व्यावसायिकांना होत आहे.
-राहुल जगताप, विक्रेते
९ पासून श्रावण महिना
व्रतांचा राजा असलेल्या श्रावण मासात भगवान शिवशंकराची उपासनेचा पर्वकाल असतो. मंगलमय व्रतवैकल्यांच्या श्रावण महिन्याच्या पर्वास ९ ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. यंदा २९ दिवसांचा श्रावण मास आहे. श्रावण महिन्यात व्रतवैकल्ये सण-उत्सवांची मांदियाळीची श्रावणापासून रेलचेल असते. यंदा श्रावण मासास श्रावणी सोमवाराने सुरुवात होत असून, पाच श्रावणी सोमवार आहे. शनि प्रदोषाची पर्वणी आहे.