लोकमत न्यूज नेटवर्क कजगाव, जि.जळगाव, दि.26 : कजगाव, ता.भडगाव येथील तमाशा कलावंत नामांकित तमाशाचा गायक अनेक गाण्यावर वन्समोअर घेणारा तरुणांचा चाहता तब्बल 18 ते 20 वर्षे तमाशात आपल्या गायनावर अधिराज्य गाजवणारा हमीद मेहतर हा गेल्या अनेक वर्षापासून शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. मात्र शासकीय कार्यालयात अनेक चकरा मारूनदेखील अद्यापही कोणतीही दखल शासन दरबारी घेतली नाही. यामुळे त्यांनी शेवटी आपल्या उदरनिर्वाहासाठी घडय़ाळ दुरुस्ती व बँडमध्ये गायनाचे काम करून पोटाची खळगी भरावी लागत आहे. कजगाव येथील रहिवासी व प्रसिद्ध तमाशा कलावंत गायक हमीद शेख गुलाब मेहतर हे गेल्या अनेक वर्षापासून कलाकार मानधन पासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना दोन वेळचे जेवणही महाग झाले आहे . हमीद मेहतर यांनी तब्बल 18 ते 20 वर्षे रघुवीर खेडकर, बाबूराव बोरगावकर, काळू बाळू अशा अनेक मोठमोठय़ा लोकनाटय़ तमाशा मंडळात गायक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यामुळे त्यांना कजगावसह परिसरात गायक ही पदवी जनसामान्य लोकांनी व तमाशा रसिकांनी बहाल केली आहे. हमीद मेहतर यांनी खान्देशासह पुणे, पिंप्री, चिंचवड, मराठवाडय़ातील अनेक जिल्ह्यात व अनेक छोटय़ा-मोठय़ा यात्रेत जाऊन व गावात जाऊन आपली कला ते तमाशाच्या माध्यमातून रसिकांसमोर सादर करीत होते. रसिक प्रेक्षकही त्यांच्या कलेला, मधूर गायनाला मोठय़ा आनंदाने साथ देत होते. मात्र कालांतराने प्रकृती खराब झाल्याने त्यांनी तमाशामध्ये जाणे कमी केले. पुढे ते परत कजगाव या आपल्या गावी आले. मात्र त्यांना त्यांच्यातील कलेने गावात कधीही स्वस्थ बसू दिले नाही. हमीद यांनी पुन्हा तमाशामध्ये जाणे चालू केले. मात्र प्रकृतीच्या वाढत्या तक्रारी पाहून त्यांना आपला तमाशातील गायनाचे काम सोडावे लागले व पुन्हा घरी थांबावे लागले. मात्र येथे येवून हमीद यांना आपल्या उदरनिर्वाहासाठी घडय़ाळ दुरुस्ती व एका बँड पार्टीत काम करावे लागत आहे. एकेकाळचा प्रसिद्ध गायक आज स्वत:च्या पोटासाठी लग्नात गाणे म्हणून आपला उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे हमीद नेहमी नैराशात असतात. अशा परिस्थितीत शासनाने त्यांना लवकरच मानधन सुरू करण्याची प्रतीक्षा आहे. अनेक वेळा मारल्या, चकरा अनेकांचे धरले पाय गायक हमीद यांनी आपल्याला मानधन मिळावे म्हणून शासकीय कार्यालयाच्या अनेक वेळा चकरा मारल्या. मात्र त्यांना कोठेही न्याय मिळाला नाही. ते अनेक लोकप्रतिनिधींच्या दारी गेले व मदतीसाठी हात पुढे केला. प्रत्येकाने आश्वासन दिले. मात्र कोणाकडूनही न्याय मिळाला नाही. माजी आमदार दिलीप वाघ यांनीही तत्कालिन सरकारच्या काळात प्रय} केले होते. मात्र त्याचाही फायदा त्यांना झाला नाही. त्यांनी अनेक वेळा पंचायत समितीच्या चकरा मारल्या. परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना खाली हात परतावे लागले.
कजगावातील तमाशा कलावंत अद्यापही न्यायाच्या प्रतीक्षेतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 6:01 PM
मानधन मिळण्यासाठी शासन दरबारी मारल्या अनेक चकरा
ठळक मुद्देकजगाव येथील तमाशा कलावंत अजूनही शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहे. कोणी न्याय देईल का, अशी त्यांची स्थिती झाली आहे. कलाभूषण रघुवीर खेडकर यांनी उत्तम कलाकार म्हणून हमीद यांना प्रमाणपत्र दिले आहे.2005 व 2006 मध्ये जिल्हा परिषद नांदेड व पंचायत समिती, लोह यांच्या वतीने कला महोत्सवात सहभागी झाल्याबद्दल हमीद यांना दिलेले प्रशस्तीपत्र बहाल. कलावंत म्हणून मानधन मिळावे यासाठी 4 डिसेंबर 2013 रोजी प्रशासनाकडे प्रस्ताव दाखल केला होता.