जळगाव : जिल्ह्यात यंदा थंडी ये-जा करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीचे आगमन झाल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गायब झाली. डिसेंबरमध्ये थंडीची लाट काही दिवस कायम राहिली, मात्र त्यानंतर नवीन वर्षात थंडी पुन्हा गायब झाली आहे. दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून, पावसाचाही अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रविवारी शहराचे किमान तापमान १७ अंशांवर, तर कमाल तापमान ३० अंशांपर्यंत कायम होते.
कानळदा रस्त्याचे काम जोरात
जळगाव : शहरातून जाणाऱ्या कानळदा रस्त्याच्या नवीन कामाला वेग आला असून, अनेक वर्षांपासून खराब झालेल्या केसी पार्क परिसरातील रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. हा रस्ता जळगाव तालुक्यातील १७ गावांना जोडणारा रस्ता आहे. काही वर्षांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्यामुळे वाहनधारकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत होते. चोपडा ते जळगावपर्यंतच्या रस्त्यांचे हे काम होत असून, जळगाव ते किनोदपर्यंतच्या रस्त्याचे काम आतापर्यंत झाले आहे.
४६ कोटींच्या रस्त्यांसाठी मार्च उजाळणार
जळगाव : शहरातील नवीन रस्त्यांच्या कामासाठी मनपा फंडातून ४६ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता. तसेच महासभेनेदेखील या निधीला मंजुरी दिली होती. मात्र, मंजुरी देऊन आता तीन महिन्यांच्या वर कालावधी झाला असतानाही मनपाकडून अद्यापही निविदाप्रक्रिया राबविण्यात आलेली नाही. दरम्यान, अमृतचे काम संपल्यानंतर रस्त्यांचे कामे घेण्यात येऊ नये, असे काही नगरसेवकांचे मत आहे. तसेच प्रशासनदेखील अमृतनंतरच कामाला सुरुवात करण्यावर भर देणार आहे. त्यामुळे नवीन रस्त्यांसाठी मार्च महिना उजळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
वॉटरग्रेसबाबत विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा
जळगाव : शहराच्या दैनंदिन सफाईचा मक्ता असलेल्या वॉटरग्रेस कंपनीने साई मार्केटिंगला उपठेका दिल्याप्रकरणी मनपाकडून तपास सुरू आहे. युनियन बँकेने आपल्याकडे करारनामा नसल्याचा खुलासा मनपाकडे सादर केला होता. तसेच दुसऱ्या खुलास्यात सफाईच्या ठेक्याच्या खात्याचे सर्व अधिकार सुनील झंवर यांच्याकडे असल्याची माहिती बँकेने दिली होती. याबाबत मनपाने विधी तज्ज्ञांकडे अभिप्राय मागितला होता. मात्र, आठवडा होऊन विधी तज्ज्ञांच्या अभिप्रायाची प्रतीक्षा आहे.
सुप्रीम कॉलनीत पाण्याची समस्या
जळगाव : शहरातील सुप्रीम कॉलनी व लागून असलेल्या पोलीस कॉलनीत गेल्या दहा दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. काही दिवसांपासून या भागात पाणी येत नसून, जे पाणी येते तेदेखील कमी दाबाने येत असल्याने या भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. या भागात नेहमीचीच समस्या कायम आहे. अनेकवेळा मनपा प्रशासनाकडे व महापौरांकडे तक्रारी करूनदेखील कोणतीही कार्यवाही अद्यापपर्यंत झालेली नाही. भर हिवाळ्यात ही समस्या असल्याने उन्हाळ्यात तर समस्या बिकट होईल अशी व्यथा या भागातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.