बीएचआरमध्ये फसवणूक व अपहार झाल्याची फिर्याद पुण्यातील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना खंडेराव घोरपडे (६५,रा.पुणे) यांनी २५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजता डेक्कन पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर २६ रोजी सकाळी सात वाजता १३५ जणांचा समावेश असलेले १२ पथके जळगावात धडकले. गुन्हा दाखल झाल्यानंतर पथक जळगावात धडकले यावरुन कारवाईची किती तत्परता होती, याची प्रचिती येते. या फिर्यादीत कंडारे याचे दुसऱ्या तर झंवर याचे पाचव्या क्रमांकावर आरोपी म्हणून नाव आहे. ही कारवाई करताना अवसायक जितेंद्र कंडारे व सुनील झंवर यांना अटक करायची होती? तर आधीच त्यांचे मोबाईल लोकेशन किंवा स्थानिक पोलिसांमार्फत माहिती काढून त्यांच्यावर नजर ठेवता आली असती किंवा ताब्यातही घेता आले असते, मात्र तसे झाले नाही. या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार दोघेच असताना अजून त्यांना अटक नाही. या दोघांना जाणीवपूर्वक अटक झाली नाही की काय?, ज्यांना अटक केली आहे, त्यांनाच अटक करायची होती? अशी चर्चा आता सुरु झालेली आहे.
पोलिसांना हे सहज जमले असते
कंडारे व झंवर मुख्य सूत्रधार असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यावर लगेच नजर ठेवता येणे शक्य होते. या पथकातील प्रमुख तथा आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी जळगाव शहराची संपूर्ण कल्पना होती, त्या अपर पोलीस अधीक्षकही होत्या. येथून बदलून त्यांना फक्त दोन महिनेच झाले होते. आरोपी कुठे आहेत, त्यांच्या संपर्कात कोण आहेत याची माहिती काढणे यंत्रणेला अवघड नाही. अत्याधुनिक यंत्रणा त्यांच्याकडे आहे. तज्ज्ञ अधिकारी, कर्मचारी देखील आहेत. कंडारे व झंवर हे काही हाणामारी व घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार नाहीत. हे हायप्रोफाईल आरोपी झालेले आहेत. त्यांचा अधिकारी व राजकीय क्षेत्रातील अनेकांशी घनिष्ट संबंध आहे, त्यामुळे त्यांचा आश्रय मिळणे सहज सोपे आहे.
इतर आरोपीही अटकेत नाही
या गुन्ह्यात माहेश्वरी, बनावट वेबसाईट तयार करणारा अहमदाबादचा कुणाल शहा, प्रकाश वाणी, योगेश साखला यांनाही आरोपी करण्यात आलेले आहे. कुणाल शहाचा अटकपूर्व अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे तर प्रकाश वाणी यांना तात्पुरता अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. उर्वरित आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. बड्या व्यक्तीपर्यंत पोहचण्यासाठी धडपड सुरु आहे की काय? अशीही चर्चा आता रंगू लागली आहे.