सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पर्यटन पॉईंट तयार होऊ पाहात असलेला कांताई बंधारा हा अलीकडे जीवघेणा पॉईंट ठरू लागला आहे. गेल्या दोन वर्षात निसर्गाचा आनंद लुटायला आलेल्या चार तरुणांचा या बंधाऱ्यात बुडून मृत्यू झालेला आहे. दोन दिवसांपूर्वीच आकाश चंद्रकांत पाटील (वय २१,मयूर कॉलनी, पिंप्राळा मूळ रा.साकेगाव,ता.भुसावळ) हा तरुण बंधाऱ्यात बुडाला. गेल्या वर्षी देखील या बंधाऱ्यात दोन तरुण बुडाले होते, त्यापैकी एकाचा जीव वाचला होता तर दुसऱ्याचा जीव गेला होता. ‘लोकमत’ प्रतिनिधीने मंगळवारी या बंधाऱ्यावर जाऊन पाहणी केली असता हा बंधारा व परिसर कसा धोकादायक हे निदर्शनास आले.
तालुक्यातील धानोरा शिवारात गिरणा नदीत जैन उद्योग समूहाने हा बंधारा तयार केला आहे. १६ ऑक्टोबर २०१३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्याहस्ते या बंधाऱ्याचे जलपूजन व उद्घाटन झाले होते. गिरणा नदीतून वाहणारे पाणी दापोरा व त्यांनतर पुढे धानोरा शिवारात अडविण्यात आले आहे. या पाण्याचा आजूबाजूचे शेतकरी व जैन उद्योग समूहाला फायदा होता. बंधाऱ्याला लागून आंब्याची बाग तयार करण्यात आलेली आहे. बंधाऱ्यात बाराही महिने २४ तास पाणी असल्याने साहजिकच त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. शहरापासून अवघ्या पाच ते सात किलोमीटर अंतरावर हा बंधारा असल्याने तेथे पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
एका बाजूने संरक्षक कठडा तर दुसरी बाजू धोकेदायक
आंब्याच्या बागांपासून टाकरखेडा, वैजनाथ, खेडी कढोलीकडे जाताना या बंधाऱ्यावर सिमेंटचा रस्ता तयार करण्यात आलेला आहे. एका बाजूने पाणी अडविल्यामुळे दुसऱ्या बाजूला पाणी नसते. नदी कोरडीठाक आहे. याच बाजूने संरक्षक कठडे लावण्यात आलेले आहेत तर ज्या बाजूने पाणी आहे, तेथे कठडे नाहीत, आणि याच बाजूने पाय घसरुन तरुण बुडालेले आहेत.
‘आवो जावो घर तुम्हारा’
या बंधाऱ्यात सातत्याने दुर्घटना होत असताना येथे प्रशासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. पर्यटन तसेच पोहण्यासाठी येणाऱ्यांना येथे कोणीच रोखत नाहीत. प्रशासनाकडून ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह कोणत्याही यंत्रणेकडून येथे खबरदारी घेतली जात नाही. ‘आवो जावो घर तुम्हारा’ या प्रमाणे कोणीही यावे, केव्हाही यावे व मनाला पटेल ते करावे, अशी स्थिती येथे आहे.
इशाऱ्याचा फलक नावालाच
बंधाऱ्याकडे जाताना सुरुवातीला धोक्याची सूचना असलेला फलक लावण्यात आलेला आहे. कांताई बंधाऱ्याच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नागझिरी, धानोरा आदी शिवारात जाण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे त्यात नमूद केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने हा इशारा देण्यात आला असला तरी हा फलक नावालाच उरला आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये दोघं बुडाले, एकाच जीव वाचला, दुसरा मृत झाला
गेल्या वर्षी २० जुलै रोजी कांताई बंधाऱ्यात बुडालेल्या चेतन अरुण पाथरवट (३१, श्रीराम नगर, असोदा रोड)व सागर बाळू पाटील (२७, कांचन नगर) हे दोघं मित्र बुडाले होते. त्यात सागर याला वाचविण्यात यश आले होते तर चेतन बेपत्ताच झाला होता. दुसऱ्या दिवशी तब्बल १६ तासांनी चेतन पाथरवट या तरुणाचा मृतदेह पाण्यात फुगून तरंगत वर आला होता. तेथे १५ फूट खोल खड्डा होता. चेतन हा गेल्या काही दिवसांपूर्वीच बॅँकेमध्ये कंत्राटी पध्दतीने शिपाई म्हणून रुजू झाला होता. एका घटनेत पती-पत्नी फिरताना पतीचा पाय घसरुन बुडून मृत्यू झाला होता.
तरुण बुडाला तरी नागरिक आनंद लुटण्यात व्यस्त
बंधाऱ्यात तरुण मुलगा बुडाला, त्याचे मित्र आक्रोश करताहेत, काही जण त्याचा शोध घेताहेत असे असताना तेथे शेकडोच्या संख्येने नागरिक सहकुटुंब आनंद लुटत होते. कोणी बंधाऱ्यावर सेल्फी काढत होते तर कोणी आंब्याच्या बागांमध्ये फोटो सेशन करीत होते. काही जण बागेत जेवण करीत होते. चारचाकी, दुचाकीने अनेक जण येथे आले होते. किमान तीनशेच्या जवळपास नागरिक तेथे होते.