दीपनगर, ता. भुसावळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहाजवळील कपिलनगर वस्तीजवळ २ जुलैच्या मध्यरात्री १२:३० सुमारास लक्झरी व कंटेनर या दोघांमध्ये भीषण अपघात होऊन, यामध्ये एका प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला होता व अन्य नऊ प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली होती. यातील जखमी व इतर प्रवाशांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था कपिलनगर वस्तीतील नागरिकांनी केली.
अपघातातील कंटेनर चालक कुलदीपसिंग याला अद्यापही ताब्यात घेतले नसून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याचे तपास हेडकॉन्स्टेबल मनोहर पाटील यांनी सांगितले.
या घटनेमध्ये दोघा वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. हा अपघात इतका भीषण होता की, अपघातग्रस्त वाहने व कपिलनगर परिसरातील एक घर यातील अंतर फक्त पाच फूट इतकेच राहिले होते. या घटनेची माहिती परिसरात कळताच, परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेल्या सर्व प्रवाशांना उचलून त्यांना मलमपट्टी केली व त्यांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था स्वखर्चातून करून दिली.
या कोरोना काळात माणूस माणसाला स्पर्श करतानाही मरणाची भीती बाळगतो, परंतु यास कपिलनगरमधील सर्व नागरिक अपवाद ठरले आहेत. त्यांनी अपघातात जखमी प्रवाशांची देखभाल करून ३ रोजी सायंकाळी चार वाजता लक्झरी गाडी उपलब्ध करून प्रवाशांना सुखरूप निरोप दिला.
याप्रसंगी अतिशय कृतज्ञतापूर्वक व भावनापूर्वक सर्व प्रवाशांनी कपिलनगरमधील नागरिकांचे आभार मानले.
मागील काही महिन्यांपूर्वी याच घटनास्थळी वंचित बहुजन आघाडी या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व कपिलनगरवासीयांनी कपिलनगरातील नागरिकांना रहदारीसाठी उपरस्ता किंवा बोगदा करून मिळावा, यासाठी प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन, चार तास रास्ता रोको आंदोलन केले होते. योगायोग याच ठिकाणी हा मोठा भीषण अपघात झाला आहे. तरी प्रशासनाने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा व लवकर पर्याय रस्त्याचा मार्ग करून मिळावा, अशी परिसरातील नागरिकांमधून मागणी होत आहे.