जीवनरुपी वृक्षाला मृत्यू हे लागलेले सगळ्यात गोड फळ आहे. त्या फळाचा प्रत्येकाला स्वीकार करावाच लागतो, मग जिवाची इच्छा असेल काय किंवा नसेल काय. जीवनात जन्माची तारीख, लग्नाची तारीख, प्रत्येकाला सांगता येते, पण मृत्यूची तारीख कोणालाच सांगता येत नाही. मृत्यूची तारीख निश्चित नाही, पण मृत्यू मात्र निश्चितच आहे .उपजे ते नासे। नाशिले ते पुनरपि दिसे। हे घटिका यंत्र जैसे । परिभ्रमे गा ॥ म्हणजेच मृत्यूच्या आत सावध होणे खरे जीवन आहे. परमेश्वराने शंभर वर्ष आयुष्य दिलंय त्याचे योग्य व्यवस्थापन करणे आपले कर्तव्य आहे.प्रथमं नार्जित विद्या। व्दितीय़ नार्जित़ धऩ।। तृतीय़ नाार्जित पुण्यं। चतुर्थ़ किंम करिष्यति।।आयुष्यात पहिली २५ वर्षे विद्याभ्यास करावा, नंतरची २५ वर्षे धन, पैसा कमवावा, आयुष्यातली तिसऱ्या टप्प्यातली २५ वर्षे कमावलेले धन सन्मार्गात व्यतित करावे. या तीन टप्प्यात जर तीन गोष्टी जमल्या नाहीत, तर शेवटच्या टप्प्यात पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. जीवन म्हणजे जुगार आहे. जुगारात चांगली पाने कधी सोडायची नसतात. पण चुकीची पानेही उचलायची नसतात. चांगली पाने सोडणारा किंवा चुकीची पाने उचलणारा हारतोच. जीवनात अगदी त्याचप्रमाणे चुकीची माणसे जवळ केल्याने किंवा चांगली माणसे दूर केल्याने माणसे पराभूत होतात.जीवनाची दुसरी व्याख्या -म्हणजे अष्टदल. अष्टदल म्हणजे रांगोळी. दारात काढलेली रांगोळी किती ठिपक्यांची काढायची हे पुस्तकात लिहलेले असते, पण काढलेल्या रांगोळीत कोणते रंग भरायचे.. हे त्या काढणाºया तरुणी अथवा महिलेच्या हातात असते.अगदी त्याचप्रकारे आयुष्याची रांगोळी किती वर्षाची काढायची? हे परमेश्वराच्या हातात असते पण त्याने काढलेल्या ५०, ६०, ७० वर्षांच्या रांगोळीत प्रेमाचे, सदाचाराचे, माणुसकीचे कोणते रंग भरायचे हे मात्र आपल्याच हातात असते.जीवनाची तिसरी व्याख्या अशी आहे पहा, जीवन म्हणजे संवादिनी. संवादिनी म्हणजे हार्मोनियम. हार्मोनियम वाजवताना तिच्या सगळ्याच पट्टया महत्त्वाच्या असतात. ,पण सर्व एकाच वेळी वाजवायच्या नसतात काही पट्टया सोडायच्या तर काही पट्टया वाजवायच्या असतात. वाजवलेल्या पट्टयांनी गर्व करायचा नसतो. सोडलेल्या पट्टयांनी अपमान धरायचा नसतो. कारण सोडलेल्या पट्टया जर सुटल्याच नसत्या तर वाजलेल्या पट्टयांना राग रागेश्वरी, भैरवी निर्माण करता आलीच नसती. अगदी त्याचप्रकारे सुखाच्या पट्टया वाजवायच्या असतात आणि दु:खाच्या पट्टया सोडायच्या असतात. जीवन हे सुख -दु:ख हे जीवनाचे सारभूत गणित आहे. जीवन हे गणित आहे, त्यात जन्म ही बेरीज, लग्न हा गुणाकार तर मृत्यू ही वजाबाकी आहे. म्हणून आदर्शवत जीवन हेच जीवनाचे सार आहे.- ज्ञानेश्वर महाराज पाटील (जळकेकर)
कर्मे इशु भजावा....
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 11:54 PM