भुसावळ, जि.जळगाव : गोरखपूरवरून मुंबईकडे जाणाºया डब्याला जोडणी करणारा बफर प्लंगरला तडा गेल्यामुळे व ते कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला. बुधवारी सकाळी हा प्र्रकार घडला.गाडी क्रमांक १५०१८ गोरखपूर एलटीटी ही गाडी भुसावळ स्थानकावर फलाट क्रमांक चारवर येत होती. तेव्हा सीएनडब्ल्यू यांत्रिक विभागाच्या कर्तव्यावर असणारे रोलिंग इन कर्मचारी जितेंद्र मसाने, रवींद्र कोळी, नरेश दमाळे हे गाडीचे निरीक्षण करीत होते. यादरम्यान इंजिनपासून आठवा कोच क्रमांक एस/८ मुंबईकडील दिशेने जाणाºया बफरला तडा गेल्याचे निदर्शनास आले.घटनेची माहिती लागलीच वरिष्ठ अधिकारी स्टेशन निर्देशक जी.आर. अय्यर, सहाय्यक मंडळ यांत्रिक अभियंता जावेद असलम, यांत्रिक विभागाचे अधिकारी वर्ग यांना कळविण्यात आली. ज्या बफरला तडा गेला होता ते बदलून त्याऐवजी दुसरे बफर जोडून निर्धारित वेळेपेक्षा एक तास २० मिनिटाने उशिराने गाडी मुंबईकडे प्रस्थान करण्यात आली.याकामी प्रकाश चौधरी, साजिद खान यांनी बफर बदलण्यास मदत कार्य केले.दरम्यान, गाडी स्थानकावर येण्यापूर्वी कर्तव्यावर असणारे रोलिंग इनचे कर्मचारी यांच्या हा विषय वेळीच लक्षात आला नसता व अशा स्थितीमध्ये गाडीने पुढे मार्गाक्रमण केले असते तर गाडी रुळावरून उतरण्याची मोठी शक्यता होती. यामुळे मोठा अपघात घडला असता. हा प्रकार वेळीच कर्मचाºयांच्या निदर्शनास आल्यामुळे काशी एक्सप्रेसचा अपघात टळला.
कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने काशी एक्सप्रेसचा अपघात टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 6:23 PM