जळगावातील घराचीही तपासणी : तीन जणांनी दिल्या तक्रारी
जळगाव / कासोदा : कापड व्यापारी श्रीराम गणपती बियाणी यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी संदर्भात मंगळवारी सहकार विभागाच्या पथकाने बियाणी यांच्या कासोदा येथील दुकान , घरी तसेच जळगाव शहरात पिंप्राळा रेल्वे गेटनजीक असलल्या दत्त कॉलनीतील घरी धाडी टाकल्या. एरंडोलचे सहाय्यक निबंधक के. पी.पाटील व अमळनेर येथील सहाय्यक निबंधक जी.एच.पाटील यांच्या नेतृत्वाखाली या दोन पथकाने सकाळी ११ वाजता कारवाई सुरु केली. त्यांना कासोदा पोलिसांनी सहकार्य केले आहे.
आधिक माहिती अशी की,कासोदा येथील श्यामलाल जमनालाल सुतार, एरंडोल येथील संजय आत्माराम चौधरी तसेच दयाराम सखाराम चौधरी या तिघांनी श्रीराम बियाणी यांच्या विरोधात बेकायदेशीर सावकारी विरोधात तक्रार केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार सुतार व चौधरी यांना सारोळा बद्धी जि. अहमदनगर येथे शेतजमीन घेण्यासाठी पैशांची गरज होती. यासाठी बियाणी यांच्याकडे व्याजाच्या पैशासाठी मागणी केली, मात्र बियाणी यांनी सदर शेत जमीन मूळ मालकाकडून माझ्या नावाने करा, त्यानतंर आपण मुद्दल व व्याजाची फेड केल्यानतंर सदर जमीन परत करेल, असे सांगितल्याने आपसात करार ठरला. त्या नतंर मुद्दल व व्याजाची परत फेड केली. मात्र जमीन परत करण्यासंदर्भात बियाणी यांनी टाळाटाळ केली. सदर जमिनीचे मूल्याकंन व बाजार भाव जास्त असल्याने खरेदी करून दिली नाही.
दुसरी तक्रार संजय चौधरी यांच्या पत्नीच्या नावे असलेला बांधीव प्लॉट होता. गट नं. १०५८, प्लॉट नं.१३ याच्या आपसातील करारानुसार बियाणी यांनी बांधीव प्लॉट त्यांची सून सपना शैलेश बियाणी यांच्या नावाने खरेदी करून दिला होता. मात्र सदर प्लॉटवर घेतलेले मुद्दल व व्याज घेऊन त्यांनी खरेदी देण्याचे टाळले. तसेच बियाणी यांनी सदर प्लॉटची परस्पर विक्री केली. याशिवाय तिसरी तक्रार एरंडोल येथील दयाराम सखाराम चौधरी व कमलाबाई दयाराम चौधरी यांनी केली आहे. चौधरी यांच्या मालकीचा बांभोरी येथील गट नबंर १९४ प्लॉट क्रं.३ हा बियाणी यांना व्याजाचे पैसे घेण्यासाठी खरेदी करुन दिला. सदर मुद्दल व व्याजाची रक्कम परत फेङ करुनदेखील खरेदी देत नाही म्हणून तक्रार केली आहे.
मंगळवारी सकाळी पथकासह पोलीस संबंधितांच्या घरी व दुकानात एकाच वेळी येऊन घरातील दस्तऐवजची तपासणी करीत असल्याची वार्ता गावात पसरल्याने जोरदार चर्चा सुरू होती.
सहाय्यक निबंधक के.पी. पाटील यांनी हा महत्त्वाचा दस्तावेज जळगाव येथील कार्यालयात पाठविला असून याची तपासणी झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे सांगत या विषयी आणखी काही तक्रारी आल्यास पुन्हा अशीच कारवाई केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.