गांधीजींच्या प्रत्येक स्वातंत्र्य लढ्यामागे कस्तुरबांनी आपली आंतरिक शक्ती उभी केली. त्यांनी चळवळीत केवळ ‘मम’ म्हणून सहभाग नोंदविला नाही. त्या कृतीशील सहकारी राहिल्या. चंपारण्यात कस्तुरबांची खूप वेगळी वेगळी रूपं बघायला मिळाली. ५०-५० लोकांचा स्वयंपाक करणाºया कस्तुरबा, शिक्षिका कस्तुरबा, स्वच्छतेचा व्रत देणाºया कस्तुरबा आणि गांधींची शक्ती बनून दशांगुळे उरलेल्या कस्तुरबा गांधीजी आणि कस्तुरबांच्या सहजीवनाचे मनोरम चित्र चंपारण्यात दिसते. इतिहासाला ललामभूत असणारा स्वातंत्र्य लढ्याचा हा इतिहास कस्तुरबांच्या आठवणींनी भावसमृद्ध झालेला आहे. बिहारचा लढा गांधी चळवळीत अनेक सत्याग्रही साधकांना जोडणारा ठरला. त्या झगमगत्या अध्यायाचे हे पृष्ठ.निळीचा सत्याग्रह सुरू झाला. गांधीजींना बिहारात शिक्षणाचा अभाव दिसला. पोरे गावात उनाडक्या करत. टिवल्या-बावल्या करत हिंडत. नुसतीच फिरत. त्यांनीे शाळा चालवायचे ठरवले. शिक्षक मिळेनात. त्याना पदवीधारी शिक्षक नको होते. जीवनधारी शिक्षक हवे होते. त्यानीे कस्तुरबावर ही जबाबदारी सोपवली. ती काही शिकलेली नव्हती. तिच्या मनाचा कोंडमारा होत असायचा. पहिल्या भेटीपासून गांधीजींनी तिला शिकायचा आग्रह धरला होता. ‘शिकून घे कस्तूर’, असे सांगितले होते. आपण लक्ष दिले नाही. आपले चुकले हा बोध तिला सतत होत राहिला होता. आपण मागे राहिलो. आपण त्याच्या आग्रहाला मान का नाही दिला? तिचे मन तिला जाब विचारू लागले होते. ती हिरमुसली. चार बायका जमल्यात. यातल्या साºया बायका शिकलेल्या होत्या असे नव्हते. एकदा तर तिने गांधीजींना विचारले, ‘हे बघा, मी शाळेत शिकवण्याचे काम कसे बरे करावे? मला ना लिहिता येतं, ना वाचता येतं. मी शाळेचा उंबरठादेखील कधी ओलांडलेला नाही.’ यावर शांतपणे गांधीजी उत्तरले की, त्याना हे सारे ठाऊक आहे. ‘मग मी काय करेन? ‘या कस्तुरबाच्या प्रश्नावर गांधीजी म्हणाले, ‘तू शाळा झाडून काढशील. शाळा सारवून टाकशील. स्वयंपाक करशील. तू या मुलांना शिकवायचे कामही करशील. ते समजून घे.’ हे ऐकल्यावर कस्तुरबा बोलल्या, ‘पण मला बापडीला स्वत: तरी कुठे येते लिहायला वाचायला? मी काय शिकवणार?’ गांधीजी म्हणाले, ‘अगं मुलाना लिहायला शिकवायचे नाही. वाचायला शिकवायचे नाही. व्याकरण शिकवायचे नाही. गणित शिकवायचे नाही. त्याना जगायला शिकवायचे. परसाकडेहून आल्यावर हात स्वच्छ धुवावेत. सकाळी दात घासावेत. नखे काढावीत. नाक शिंकरावे. जेवणापूर्वी हात धुवावेत. केसांवर कंगवा फिरवावा. ही रीतभात शिकवायची आहे.’गांधीजींच्या या निवेदनाने ती खूश झाली. ती अभिमानाने त्यांच्याकडे बघत होती. त्याना कधीही कुठलीही अडचण अशी ती येतच नाही. ती कामाला लागली. गावोगावी हिंडली. लोकांना समजावू लागली. वाटेल तिथे थुंकू नये. रस्त्यात लघवी करू नये. चुकीच्या सवयी बदलायला हव्यात. रोज कचरा गोळा करावा. गाव स्वच्छ ठेवावा. झाडू कसा बनवावा? विहिरी कशा स्वच्छ ठेवाव्यात? सांडपाणी कसे वहाते ठेवावे? व्यक्तिगत आरोग्य कसे राखावे? हे सारे ती समजावून सांगत होती. (क्रमश:)- प्रा.डॉ. विश्वास पाटील
चंपारण्यात कस्तुरबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 12:34 PM