लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मागील काळात झालेला त्रास पुन्हा होणार नाही व पदभार हस्तांतरणाची कार्यवाही ही सन्मानपूर्वक पध्दतीने होईल, अशी ग्वाही विद्यापीठाकडून मिळाल्यानंतर ‘आपल्या काम करण्याच्या पध्दतीत कुठलाही बदल होणार नाही’ या अटीवर शुक्रवारी तब्बल वर्षभरानंतर पुन्हा एस.आर.गोहील यांनी विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.पी. पाटील, कुलसचिव डॉ. बी.व्ही.पवार यांच्यासह वित्त व लेखाधिकारी विभागातील विविध अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे नियमित वित्त व लेखा अधिकारी भागवत कºहाड यांची अमरावती विद्यापीठामध्ये नियुक्ती झाल्यानंतर बी.बी.पाटील यांच्याकडे एक दिवसासाठी पदभार देण्यात आला होता. त्यानंतर हा अतिरिक्त पदभार सोमनाथ गोहिल यांच्याकडे पदभार देण्यात आला. मात्र, नोव्हेंबर २०१९ मध्ये अचानक सायंकाळी गोहील यांच्याकडून लेखा व वित्त अधिकारी पदाचा पदभार काढून घेवून तो विवेक काटदरे यांच्याकडे सोपविला होता. तेव्हा गोहील यांनी कुलकुरू यांच्याकडे तक्रार केली होती तर कुठल्याही नियमात न बसवता काटदरे यांना नियमबाह्य नियुक्ती दिली गेली असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस तसेच विविध पक्षांतर्फे आणि सिनेट सदस्यांकडून करण्यात आला होता. त्यामुळे वित्त व लेखा अधिकारी पदावरून विद्यापीठाच्या प्रशासनावर ताशेरे ओढले जात होते.
अखेर काटरदरेंनी केली कार्यमुक्त करण्याची विनंती
सहा महिन्यात वित्त व लेखा अधिकारी पदाची जागा भरणे आवश्यक होते़ मात्र, सध्या शासनाकडून परवानगी नसल्याचे कळते. दरम्यान, नुकतेच विद्यापीठाच्या वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारातून कार्यमुक्त करणेबाबत डॉ.विवेक काटदरे यांनी कुलगुरुंकडे विनंती केली होती. ती मान्य करण्यात येऊन उपवित्त व लेखा अधिकारी एस.आर. गोहिल यांच्याकडे शुक्रवारपासून अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. गोहिल यांनी डॉ.विवेक काटदरे यांच्याकडून वित्त व लेखा अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार शुक्रवारी स्वीकारला.
मागील विषय काढू नका, विद्यापीठाच्या हिताचे काम करायचेय़़
कुलगुरू व कुलसचिव यांनी गोहील यांच्याशी दोन ते तीन दिवसांपूर्वी चर्चा केली होती. गोहील यांनी कामाच्या पध्दतीने बदल होणार नाही, अन्यथा निवड पध्दतीने पद भरण्यात यावे, अशी मागणी केली. परंतु, मागील काळात झालेला त्रास पुन्हा होणार नाही व सन्मानपूर्वक पध्दतीने पदभार देण्यात येईल,अशी ग्वाही कुलसचिवांनी दिल्यानंतर शुक्रवारी सोमनाथ गोहील यांनी पदभार स्वीकारला आहे.
अमुल बोरसेंची घरवापसी
तसेच विशेष कार्य अधिकारी असे पद असणारे माजी परीक्षा नियंत्रक अमुल बोरसे यांची देखील नियुक्ती नियमबाह्य असल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इतर सदस्यांनी नाराजी व्यक्त केले होती. त्यामुळे बोरसे यांच्याविरूध्द तक्रारी होत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वी त्यांची घरवापसी केली असल्याचीही माहिती मिळाली आहे. दरम्यान, बोरसे यांच्यावर झालेला खर्च वसूल करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अॅड़ कुणाल पवार यांनी केली आहे.
काटदरेंवर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा
विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्या अनुषंगाने तत्कालीन वित्त अधिकारी विवेक काटदरे यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जिल्हा एनएसयूआयचे देवेंद्र मराठे यांनी केली आहे.