लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : म्युकरमायकोसिस वाढण्यामागे रुग्णालयांमधील अस्वच्छ साहित्य हेही कारण सांगण्यात येत असल्याने आता म्युकरमायकोसिस तसेच कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आता सीटू कक्षात हवा खेळती राहील, याची व्यवस्था करावी, तसेच परिचारिकांनी या कक्षात न बसता त्यांची बसण्याची व्यवस्था बाहेर करावी, यासह विविध सूचना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गुरूवारी दिल्या.
संसर्गजन्य रोग प्रतिबंधक समितीच्या बैठकीत ते बोलत होते. दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दालनात ही बैठक पार पडली. बैठकीला समितीचे अध्यक्ष डॉ. किशोर इंगोले, सदस्य तथा औषधवैद्यक शास्त्रविभागाचे डॉ. भाऊराव नाखले, बधिरीकरण शास्त्र विभागाचे डॉ. संदीप पटेल आदी उपस्थित होते. प्रत्येक कक्षात दोन ते तीन बेडनंतर कचरा जमा करण्यासाठी एक प्लास्टिक बॅग असावी, कक्षात प्रवेश करताना प्लास्टिकचे कर्टन लावले जावे, फरशी स्वच्छ करण्यासाठी मशिनची खरेदी करावी, अशा काही सूचना या बैठकीत अधिष्ठाता डॉ. रामानंद यांनी दिल्या.