लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाने गेल्या वर्षभरापासून प्रत्येकाच्या मनात आणि मेंदूत घर केले आहे. कोरोनाबाबत सातत्याने चर्चा सुरू असते. त्यामुळे आपणदेखील त्याचाच विचार करत असतो. त्यामुळे स्वत:ला दुसरीकडे गुंतवून ठेवावे आणि या चर्चेपासून लांब रहावे, असे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. दिलीप महाजन यांनी व्यक्त केले आहे. तसेच कोरोना होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला.
जळगाव आयएमएतर्फे जिल्हावासियांसाठी आयोजित तीन दिवसीय विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेत आयएमए जळगावचे अध्यक्ष डॉ. सी. जी. चौधरी आणि सचिव डॉ. राधेश्याम चौधरी हे देखील सहभागी झाले होते.
आयएमएचे अध्यक्ष डॉ.सी.जी.चौधरी यांनी प्रास्ताविक केले. मुख्य वक्ते डॉ. दिलीप महाजन यांनी सांगितले की, कोरोना झाल्यास सर्वप्रथम टेस्ट पॉझिटिव्ह आली हे सत्य स्वीकारा. नैराश्य येऊ देऊ नका. कोरोनाचे ८५ टक्के रुग्ण सहज बरे होतात. त्यामुळे सकारात्मक विचार ठेवा, स्वतः ८५ टक्क्यांत आहे, असे समजा. व्यसनांच्या आहारी जाऊ नका, नैराश्य येऊ देऊ नका, सतत स्वतःला कुठे तरी, कशात तरी गुंतवून ठेवा, छंद जोपासा, योगासने करा, मेडिटेशन करा, एकटेपणा ठेवू नका, भीती बाळगू नका, असे आवाहन त्यांनी केले.
मेंदूत होणाऱ्या बदलांमुळे असे नैराश्याचे विचार मनात येतात, योग्य खबरदारी घेतल्यास आपण सहज बरे होतो. कोणतीही खबरदारी न घेता मला कोरोना होणार नाही, अशा आविर्भावातदेखील राहू नका, असे आवाहन डॉ.दिलीप महाजन यांनी केले.
कोरोनाविषयी असलेल्या विशेष व्याख्यानमालेत शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. सतीश पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. नागरिकांनी त्याचा ऑनलाईन लाभ घेण्याचे आवाहन आयएमएतर्फे करण्यात आले