संशयितांना कोठडी : आणखी दोघांचा शोध सुरू
जळगाव : रिक्षात बसलेल्या वृद्धाच्या खिशातून २५ हजार रुपयांची लूट करणारा मोहसीन खान नूर खान पठाण ( वय २७,गेंदालाल मील) हा सराईत गुन्हेगार असून एक वर्षासाठी त्याला जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. हद्दपार असतानाही शहरात वावरत असल्याचे सिद्ध झालेले आहे.
दरम्यान, मोहसीन व त्याचा सहकारी शाहरुख शेख रफिक शेख (वय १९, रा.हुडको, पिंप्राळा) या दोघांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्या.ए.एस.शेख यांनी १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे ॲड. प्रिया मेढे यांनी बाजू मांडली. या गुन्ह्यातील अशरफ गफ्फार पिंजारी ( रा.फातेमा नगर) व हर्षद अन्ना मुलतानी (रा.गेंदालाल मिल) हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. अटकेतील दोघांकडून १५ हजार रुपये रोख व एक लाख रुपये किमतीची रिक्षा हस्तगत करण्यात आली आहे.
मोहसीन एक वर्षासाठी हद्दपार
या गुन्ह्यात अटक करण्यात आलेला मोहसीन पठाण याला १७ जुलै २०२० एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. अजून एक महिना तो अद्याप हद्दपार आहे. हद्दपार असलेले गुन्हेगार शहरात सक्रिय असल्याने पोलिसांचा त्यांच्यावर वचक राहिलेला नसल्याचे यावरून दिसून येत आहे. याच तारखेला शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहा गुन्हेगार हद्दपार करण्यात आले होते. तर ७ आक्टोबर रोजी आणखी एका गुन्हेगाराला हद्दपार करण्यात आलेले आहे.
आणखी असाच एक गुन्हा केल्याचा संशय
दरम्यान, या टोळीने १ जून रोजी अशोक सांडू काळे यांनाही रिक्षात बसून २५ हजार रुपये लुटण्याचा संशय पोलिसांना आहे त्यादृष्टीने पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, मुकेश पाटील, सुधीर साळवे,चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, हेमंत कळसकर व साईनाथ मुंडे यांनी केली आहे.