लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रामेश्वर कॉलनीत लग्नासाठी आलेल्या मध्य प्रदेशातील नातेवाइकांची चारचाकीतून गहाळ झालेली अडीच लाखांचे पाच तोळे दागिने व इतर वस्तू असलेली बॅग परत करुन चंदनसिंग मंगलसिंग चव्हाण व यश चंदनसिंग चव्हाण (रा. रामेश्वर कॉलनी) या बाप-लेकाने प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. ११ डिसेंबर रोजी दुपारी घडलेल्या प्रकारानंतर दोघांनी बॅग एमआयडीसी पोलिसांत आणून दिली. यानंतर पोलिसांनी संबंधिताना बोलावून बॅग सुरक्षित मुद्देमालासह स्वाधीन केली. दोघा बाप-लेकाच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
मध्य प्रदेशातील हिरापूर येथील धर्मेंद्र महेश पाटील हे गुरुवारी चुलत भावाच्या लग्नासाठी जळगावात आले होेते. लग्न आटोपल्यावर शुक्रवारी धर्मेंद्र पाटील हे त्यांचे रामेश्वर कॉलनतील नातेवाइकांच्या भेटीसाठी गेले. त्यांची भेट घेऊन त्यांनी त्यांच्या चारचाकीच्या डिक्कींमध्ये कपडे, दागिन्यांसह इतर वस्तू असलेल्या बॅगा ठेवल्या. गावी परतण्यापूर्वी ते पुन्हा कस्तुरीमार्गे लग्न असलेल्या महालक्ष्मी दालमिल येथे गेले. त्याठिकाणी दोन बॅगा ठेवत असताना वाहनाची डिक्की उघडी दिसली. यातील दागिने व इतर साहित्य असलेली एक बॅग गहाळ झाल्याचे दिसून आले.
सीसीटीव्ही तपासले
धर्मेंद्र पाटील यांनी लागलीच मार्गावरील सीसीटीव्ही तपासले असता, यात दोन जण रस्त्यावर पडलेली बॅग उचलत असल्याचे दिसून आले. हा सीसीटीव्ही फुटेजचा व्हिडिओ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार अतुल वंजारी यांना पाठविला. तक्रारीसाठी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. तक्रार दाखल करत असतानाच, सापडलेली सदरची बॅग एमआयडीसी पोलीस ठाण्यात परत करण्यासाठी येत असलेल्या चंदनसिंग मंगलसिंग चव्हाण व त्यांचा मुलगा यश चंदनसिंग चव्हाण या दोघांना सोबत घेऊन पोलीस कॉन्स्टेबल सुधीर साळवे, असीम तडवी, चेतन सोनवणे, किशोर पाटील यांनी पोलीस ठाणे गाठले. याठिकाणी पोलीस निरीक्षक प्रताप शिखारे यांच्या हस्ते धर्मेंद्र पाटील यांना त्यांचा अडीच लाखांचा मुद्देमाल असलेली बॅग परत देण्यात आली.