व्यक्तीमत्व विकासासाठी मानवापुढे निरंतर अशी एक नैसर्गिक व्यवस्था इस्लामी जीवन पध्दतीने पवित्र रमजानच्या रोजाच्या स्वरुपात ठेवली आहे.विश्व निर्मात्याने इस्लामी जीवन पध्दतीतच या सर्व मूलभूत तत्वांच्या लौकिक आणि पारलौकिक जगाचे यश निश्चित केले आहे. रोजा (उपवास) स्वाभाविक, नैसर्गिक आणि मूलभूत उपासना पध्दतीत अल्लाने व्यक्तीमत्व विकासाचे सर्व गुण अंतर्भूत केले आहेत. रोजा हा मनुष्याची सर्वांगीण उन्नती व विकास करतो. मनुष्याच्या सामाजिक, आर्थिक, व्यवसायिक, शैक्षणिक, तसेच वैज्ञानिक जीवन साफल्याची गुरुकिल्ली म्हणजे रोजा होय.रोजामुळे मनुष्यामध्ये अनेक गुणवैशिष्ट्ये निर्माण होतात. रोजामुळे माणसात निर्णयक्षमता तयार होते. योग्य वेळेवर योग्य निर्णय घेण्याची क्षमता वृध्दिंगत होते. आम्ही योग्य निर्णय योग्य वेळी घेतला नाही तर तोटा सहन करावा लागतो.योग्य वेळी सहरी व अक्तारी केली नाही तर रोजा होत नाही. निर्णय क्षमता माणसाला यशाच्या शिखरावर पोहचविते. मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात रोजामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता तयार होते.रोजा हा माणसाला ‘‘स्व’’ वर नियंत्रण करण्यास शिकवितो. त्याच्या इच्छा -आकांक्षांना नियंत्रण करण्यास शिकवतो.एकांतात रोजादार माणूस काही खाऊ-पिऊ शकतो पण तो तसे करत नाही. तो दुसरीकडे अज्ञात स्थळी जाऊन आपली भूक व तहान भागू शकतो. त्याच्यावर कोणीही संशय घेऊ शकणार नाही. अशा प्रकारे त्याला वाटले तर तो धोका देऊ शकतो परंतु तो धोका देत नाही व स्वत:वर स्वत:च्या इच्छा-आकांक्षांवर नियंत्रण ठेवतो. असाच माणूस जीवनात यशस्वी ठरतो. रोजा तर लौकिक व पारलौकिक दोन्ही जीवनाची सफलता निश्चित करतो.दरवर्षी तीस दिवस सतत एकसारखे कृत्य करत जाणे यासाठी आत्मविश्वासपूर्ण, मनोधैर्याची आवश्यकता असते. ज्या माणसाजवळ आत्मविश्वास आहे, तोच माणूस महिनाभराचे रोजे प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा ठेऊ शकतो. रोजा हा माणसात आत्मविश्वास वृध्दींगत करतो. जो मनुष्य प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा प्रयत्नशील राहतो तोच यशस्वी ठरतो. संकटात ही व्यक्ती गर्भगळीत होत नाही. अडचणींनी घाबरत नाही. अशी व्यक्ती आदर्श व्यक्तीमत्वाची धनी बनते.रोजामुळे व्यक्तीमत्व विकसित होते आणि एक आदर्श व्यक्तीमत्वाची जडणघडण करण्यास मदत होत असते....- प्रा.डॉ.एम.इक्बाल शेख, जळगाव
जीवन साफल्याची गुरुकिल्ली : रोजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 12:10 AM