जळगाव : खान्देशवासियांचे आराध्य दैवत असलेल्या कानबाईच्या उत्सवास रविवारी थाटात प्रारंभ झाला. कानबाई स्थापनेसाठी केळीच्या खांबांसह आधुनिक तंत्राच्या सहाय्याने सुशोभित आरास तयार करण्यात आली. खान्देशात या उत्सवाला ‘रोट’ ही म्हटले जाते.व्रत वैकल्यांच्या श्रावण मासात नागपंचमीनंतर पहिल्याच रविवारी खान्देशात कानबाई उत्सव असतो. सकाळी पारंपरिक नारळाला (देवी) स्रान घालण्यात आले. चौरंगावर तांब्याच्या कलशात सुपारी, पैसा टाकून व सजवून त्यावर नारळ ठेऊन देवीचा श्रृंगार करण्यात आला. दुपारनंतर देवीची विधीवत स्थापना करून श्रीसुक्ताने अभिषेक व पूजन करून सायंकाळी महाआरती करण्यात आली. यानिमित्त भाविकांनी दिवसभर उपवास केला.रोटचा स्वयंपाक बनविण्यासाठी महिलांची दुपारपासूनच लगबग सुरू होती. रोट, तांदळाची खीर, गंगाफळाची भाजी असा नैवेद्य कानबाईला अर्पण करण्यात आला. साखर-फुटाणे, लाह्या, काकडीचा प्रसाद वाटण्यात आला.पोटापाण्यासाठी बाहेरगावी गेलेले कुटुंबीय कानबाई उत्सवासाठी गावी आले आहेत. रात्री देवीच्या समोर विविध भजने, गाणे, फुगड्या, झिम्मा खेळत जागरण करण्यात आले.‘‘कानबाई मायनी जतरा दाट, माय जतरा दाट;हे दर्शन माले, मिये ना वाट. माय... मये ना वाट’’अशा कानबाईंच्या गाण्यांनी अवघ्या खान्देशचा माहोल भरुन गेला आहे.सोमवारी विसर्जनस्थापना झाल्यानंतर दुसºया दिवशी कानबाईचे विसर्जन करण्यात येते. दही-भाताचा नैवेद्य अर्पण करून पूजनाने विसर्जन करण्यात येईल. अनेक ठिकाणी नदीवर मिरवणुका काढून विसर्जन करतात.
खान्देशात आली माय कानबाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 3:28 AM