जळगाव : आमदार एकनाथ खडसे यांना विधानपरिषदेत आमदार करण्यासाठी ज्या आमदारांनी मतदान केले, ते आमदार व मंत्री अनिल पाटील आज अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे आधी खडसेंनी राजीनामा द्यावा, मगच अजित पवारांवर बोलावे. इतकेच काय, तर सुनेला भाजपकडून उमेदवारी मिळावी, यासाठी त्यांनी शरद पवार व उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात केल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केला आहे.
एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत अजित पवार यांनी सन्मान गमावला व बायकोसह तीन जणांनाच लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर मंत्री अनिल पाटील चार महिन्यांचे आमदार राहिले आहेत, असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी संजय पवार यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, योगेश देसले उपस्थित होते.
खडसे राजकीय अज्ञातवासात होते. तेव्हा शरद पवारांनी त्यांना आमदार करीत पुन्हा संधी दिली. ज्या आमदारांनी खडसे यांना विधानपरिषदेसाठी मतदान केले ते आज अजित पवार यांच्यासोबत आहेत. पक्ष वाढेल म्हणून त्यांना विरोध असताना पक्षात घेतले, त्यांच्यामुळे पक्ष तर वाढलाच नाही, उलट गटबाजी सुरू झाली. लोकसभेची निवडणूक आपण लढणार असे सुरुवातीपासून सांगून रावेरची जागा राष्ट्रवादीकडे घेतली. आता डॉक्टरचे कारण सांगून उमेदवारीपासून पळ काढला. भाजपकडून सुनेची उमेदवारी निश्चित करून घेतली. खरे तर सुनेच्या उमेदवारीसाठीच त्यांनी ही आखणी केली होती. एकप्रकारे शरद पवारांचा विश्वासघातच केला आहे.
कुटूंबासाठी पदाचा अन् सत्तेचा वापरखडसे यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर, सुरेशदादा जैन, माजी आमदार अरुण पाटील, डॉ. बी. एस. पाटील यांना राजकारणातून संपविले. माजी मंत्री सतीश पाटील, आमदार चिमणराव पाटील यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. मला पक्षातून बडतर्फ करायला लावले. सुनेसाठी स्व. हरिभाऊ जावळे खासदार असताना त्यांचे तिकीट कापले. स्वत:ला आमदारकी, सुनेला खासदार, पत्नीला दूध संघ व महानंदमध्ये चेअरमन, मुलीला पक्षात प्रदेशाध्यक्षपद व विधानसभेतही त्याच उमेदवार असतील असे सांगतात. त्यांनी पद व सत्तेचा वापर फक्त कुटूंबासाठी व लोकांना संपविण्यासाठीच केल्याचा आरोप संजय पवार यांनी यावेळी केला