जळगाव : एकनाथ खडसे यांना अनेक आजार झालेले आहेत. त्याची त्यांनी आधी तपासणी करावी, मगच माझ्या काविळचा विचार करावा, असा टोला वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी खडसेंना लगावला. जिल्ह्यातील बाजार समित्याच नाही तर राज्यातील सर्वच निवडणुका भाजप व शिंदे सेना एकत्र लढवतील, यासंदर्भात पक्षश्रेष्ठींनीही निर्णय घेतला असल्याचे गिरीश महाजन यांनी जळगावात स्पष्ट केले.
येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात थायरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. एकनाथ खडसे यांनी दोन दिवसापूर्वीच गिरीश महाजन यांना माझ्या नावाचा काविळ झाला आहे, अशी टीका केली होती. त्यावर गिरीश महाजन यांना पत्रकारांनी छेडले असता, त्यांनी एकनाथ खडसेंवर ही टीका केली.
...तेव्हाच उद्धव ठाकरेंच्या वाईट दिवसाची सुरुवातराहुल गांधी आता सावरकर यांच्याविषयी बोलणार नाहीत, असे खासदार संजय राऊत सांगत आहेत. यावर गिरीश महाजन यांनी संजय राऊत व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. खुर्ची गेली म्हणून ते आता बोलू नका, असे सांगत आहेत. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. शिवसेनेने आता सावरकर व हिंदुत्वाबद्दल काही बोलूच नये. सत्ता व क्षणिक सुखासाठी त्यांनी ते गुंडाळून ठेवलेले आहे. उद्धव ठाकरे संधीसाधू राजकारण करताहेत. औरंगाबादला होणाऱ्या सभेत राहुल गांधींचा फोटो काढून सोनिया गांधीचा फोटो लावला जाणार आहे. उद्या ते सोनिया गांधींचाही फोटो काढतील, प्रियंका गांधीचा लावतील. तीन वर्षापूर्वी काँग्रेससोबत हातवर करुन शपथविधी घेतली, तेव्हाच उद्धव यांच्या वाईट दिवसाची सुरुवात झाली होती, असे गिरीश महाजन म्हणाले.