लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा कोरोना हा खरा की खोटा, असा संशय उपस्थित करून जागरुक नागरिक मंचचे शिवराम पाटील यांनी अनेक गंभीर सवाल शनिवारी पत्रकार परिषदेत उपस्थित केले. खोटा कोरोना दाखविण्याचा खडसेंचा प्लॅन असू शकतो, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. २९ रोजी खडसेंऐवजी त्रयस्थ व्यक्तीचेच स्वॅब घेतल्याचा संशय असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे.
खडसे यांची ३० डिसेंबरला ईडीची चौकशी होती. ते २७ रोजी जळगावहून निघाले होते. २८ रोजी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे फोटो खडसेंच्याच निकटवर्तींयांनी टाकले होते. त्यानंतर २९ रोजी त्यांना सर्दी, खोकला झाल्याचे वृत्त वाचण्यात आले. त्यानंतर त्यांच्या नावाने जिल्हा रुग्णालयात ५५९७९ या क्रमांकाने त्यांचे ओपीडीत नाव आहे. त्याच दिवशी त्यांना मुक्ताई नगरच्या उपजिल्हा रुग्णालयातून जळगाव पाठविण्यात आल्याची नोंद आहे. त्यानंतर ३० डिसेंबरला त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला, अशी माहिती शिवराम पाटील यांनी दिली. २९ रोजी खडसे जळगाव, मुक्ताईनगर आणि मुंबईत कसे, असा सवाल उपस्थित करून हे सर्व फोनवरून मॅनेज केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे.
पाटील यांनी उपस्थित केलेले प्रश्न
खडसे मुंबईला होते तर सिव्हिलच्या ओपीडी लाइनमध्ये खडसे होते का?
मुक्ताईनगरला ओपीडी लाइनमध्ये खडसे होते का?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खडसे भेटले होते तर मुख्यमंत्री आयसोलेट झाले का?
त्यांची कोरोना तपासणी झाली का? खडसेंसोबत असलेल्यांची तपासणी झाली का?
खडसे रुग्णालयात का दाखल नाहीत?
त्रयस्थ माणसाचा स्वॅब घ्यायला लावला का?
राजालाही तेच नियम हवे
सामान्य माणूस कोरोना बाधित झाल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यासाठी पकडून आणले जाते, मग खडसे बाधित झाल्यानंतर शिवाय मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्यासाठी मात्र वेगळे नियम का? मुख्यमंत्री क्वारंटिन का? नाही, आणि खडसेंना अनेक व्याधी असतानाही ते रुग्णालयात का? नाहीत, त्यामुळे संशयाला वाव असल्याचे शिवराम पाटील यांनी म्हटले आहे.
कोरोना मर्जीने चालतोय...
खडसेंना जर ईडीची चौकशी टाळायची होती तर त्यांनी तसे सांगितले असते तरी ईडीने ऐकले असते, असेही शिवराम पाटील यांनी म्हटले आहे. नोव्हेंबर महिन्यातही खडसेंनी स्वत: कोरोना झाल्याचे जाहीर केले होते; मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. तेव्हा जर त्यांना कोरोना झाला होता तर एकाच महिन्यात एकाच व्यक्तीला दोनदा कसा कोरोना होणार, कोरोना हा त्यांच्या मर्जीने चालतोय, असे वाटतेय, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे.
खडसेंचा फोन बंद
कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासून एकनाथ खडसे यांचा फोन स्वीच ऑफ करण्यात आला आहे. काही निकटवर्तीयांशी संपर्क केल्यानंतर स्पष्ट सांगितले जात नसले तरी ते मुंबईत घरी उपचार घेत असल्याचे काहींनी सांगितले.
खडसे जळगाव सिव्हिलला आलेच नाही
एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगराला दिलेला स्वॅबच कोरोना चाचणी प्रयोगशाळेत तपासणीला आला होता. खडसे जळगाव सिव्हिलला आले नव्हते, जळगावला स्वॅब देण्याची गरज पडल्यास त्यांनी कार्यकर्त्यांना केसपेपर काढून ठेवायला सांगितले होते; मात्र ते न आल्याने हा केसपेपर कोराच होता, अशी एक माहिती रुग्णालयातून समोर आली आहे.