व्यायाम, ज्यूस व लसीकरणामुळे झाला फायदा
जळगाव : शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यासह व्यायाम, प्राणायाम, संत्री-मोसंबी याचे ज्यूस तसेच मटन, चिकन सूप व अंडी, हिरव्या भाज्या व फळे ,आदींचा आहारात समावेश केल्याने पोलिसांच्या रोग प्रतिकारशक्तीत प्रचंड वाढ झाली. त्याचा सकारात्मक परिणाम दुसऱ्या लाटेत दिसून आला. पहिल्या लाटेत पोलीस दलातील ३२२३ कर्मचाऱ्यांपैकी ४१० कर्मचारी कोरोनाबाधित होते, तर सातजणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत बाधितांचा आकडा निम्म्यावर अर्थात २४२ वर आला. फक्त एकाच अंमलदाराचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पहिल्या लाटेत ५७५९१ रुग्ण बाधित झाले होते, तर १३६७ जणांचा मृत्यू झाला होता. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढली. ७९१८८ रुग्ण निष्पन्न झाले, तर १०८३ जणांचा मृत्यू झाला.
दुसऱ्या लाटेत पोलिसांनी मास्क, सॅनिटायझर व सुरक्षित अंतर या शासन नियमावलीचे पालन करण्यासह व्यायाम, योगा व मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्याचा प्रयत्न केला. त्यातच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे हे स्वतः डॉक्टर असल्याने त्यांनी पोलीस बांधवांसाठी ९८ टक्के दोन्ही डोसचे लसीकरण पूर्ण करून घेतले. त्याचाही सकारात्मक परिणाम दिसून आला. पोलिसांच्या कुटुंबातील व्यक्ती पॉझिटिव्ह येत असताना पोलिसांचे अहवाल मात्र निगेटिव्ह येत आहेत. हा लसीकरणाचा फायदा असल्याचे ठाम मत पोलीस अधीक्षक डॉ. मुंढे यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी व्यायाम व ज्यूसचा वापर
रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी पोलिसांकडून रोज व्यायाम, चालणे, प्राणायाम, योगा यासह संत्री-मोसंबी यांचे ज्यूस व हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केला जात आहे. पोष्टिक व प्रोटिनयुक्त आहारावर भर दिला जात आहे.
कोट....
पहिल्या लाटेत मला कोरोनाची लागण झाली होती. बरेच दिवस रुग्णालयात उपचार घेतले. आता भविष्यात कोरोना होऊच नये यासाठी योगा, प्राणायाम रोज करतो. तसेच आंबट फळांचे ज्यूस सेवन करतो. मानसिकदृष्ट्या सक्षम असणे हेच यात महत्त्वाचे आहे.
- गोविंदा पाटील, पोलीस अमलदार
कोट....
कोरोनाची भीती व धास्ती काढली पाहिजे. काळजी मात्र तितकीच घेणे आवश्यक आहे. हिरव्या भाज्या, ज्यूस याचा आहारात समावेश असावा. लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले तर ८० टक्के धोका कमी होतो.
- रतिलाल पवार, पोलीस हवालदार
कोट.....
दुसऱ्या लाटेत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यावर अधिक भर दिला. त्यामुळे पोलीस दलातील बाधितांची संख्या मोठ्या संख्येने घसरली. इतर रुग्णांची संख्या वाढत असताना आमचे कर्मचारी रस्त्यावर उतरून कार्य करीत आहेत. लसीकरणामुळे त्यांचा धोका टळलेला आहे. योगा, प्राणायाम तर केलेच पाहिजे.
- डॉ. प्रवीण मुंढे, पोलीस अधीक्षक
पहिली लाट
एकूण रुग्ण : ५७५९१
पोलीस : ४१०
एकूण मृत्यू :१३६७
पोलीस मृत्यू : ०७
दुसरी लाट
एकूण रुग्ण : ७९१८८
पोलीस : २४२
एकूण मृत्यू : १०८३
पोलीस मृत्यू : ०१