जिल्हा बँक निवडणूक : २९ ची बैठक आता ३० रोजी ; जास्तीत जास्त जागा पदरात टाकण्यासाठी पक्ष सज्ज
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीची तारीख जाहीर होण्याआधीच राजकीय पक्षांची खलबतं सुरू झाली आहेत. काँग्रेसने स्वबळाचा नारा देऊन इच्छुकांचा शोध घेण्याचे काम सुरू केले आहे. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीकडूनदेखील एकीकडे सर्वपक्षीय पॅनलसाठी प्रयत्न करून दुसरीकडे स्वबळाचीही चाचपणी सुरू केली आहे. दरम्यान, जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनल तयार झाल्यास त्यासाठी २१ उमेदवारांच्या नावावर प्राथमिक स्तरावर खल सुरू झाला असून, ३० रोजीच्या बैठकीत यावर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जिल्हा बँकेसाठी सर्वपक्षीय पॅनलसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे सातत्याने प्रयत्नशिल आहेत. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ही २९ रोजी मुंबईत होणार होती; मात्र आता ही बैठक ३० रोजी दुपारी ४ वाजता अजिंठा विश्रामगृह येथे होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह माजी मंत्री गिरीश महाजन, डॉ.सतीश पाटील, आमदार चिमणराव पाटील, गुलाबराव देवकर, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, प्रा.चंद्रकांत सोनवणे, ॲड.रवींद्र पाटील, विष्णू भंगाळे यांच्यासह भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेचे इतर आमदार व पदाधिकारीदेखील उपस्थित राहणार आहेत.
असे असू शकते सर्वपक्षीय पॅनल
जिल्हा बँकेच्या आजवरच्या इतिहासावर एक नजर टाकली असता, वाटाघाटी करूनच संचालक मंडळ स्थापन झाल्याचे पाहायला मिळते. आताही सर्वपक्षीय पॅनलसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. या पॅनेलमध्ये सध्या चर्चेत असलेली नावे अशी आहेत.
जळगाव- आमदार सुरेश भोळे
धरणगाव- संजय पवार
अमळनेर- आमदार अनिल पाटील
पारोळा- आमदार चिमणराव पाटील
एरंडोल- अमोल पाटील
भडगाव- नानासाहेब देशमुख किंवा प्रताप पाटील
चाळीसगाव- आमदार मंगेश चव्हाण किंवा माजी आमदार राजीव देशमुख
जामनेर- आमदार गिरीश महाजन
बोदवड- ॲड. रवींद्र पाटील
मुक्ताईनगर- माजी मंत्री एकनाथ खडसे किंवा चंद्रकांत पाटील
भुसावळ- आमदार संजय सावकारे
यावल- विनोद पाटील, प्रशांत चौधरी
रावेर- नंदू महाजन
चोपडा - अजून निश्चित नाही
पाचोरा- आमदार किशोर पाटील
-(इतर मतदारसंघाच्या ६ जागांसाठी) ओबीसी- माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, इतर मतदारसंघ-खासदार उन्मेष पाटील किंवा माजी मंत्री गुलाबराव देवकर, एसटी- माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, एनटी- मेहताबसिंग नाईक, महिला राखीव २ जागांसाठी-ॲड. रोहिणी खडसे, संगीता भंगाळे, स्मिता वाघ, अस्मिता पाटील.
सर्वपक्षीय आधी राष्ट्रवादीची बैठक
३० रोजी सर्वपक्षीय पॅनलची बैठक होण्याआधी ३० रोजी दुपारी २ वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. या बैठकीतदेखील इच्छुकांच्या नावावर चर्चा होणार असून, किती जागा पदरात पाडून घ्यायच्या, याबाबतदेखील या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची
सर्वपक्षीय पॅनल झाल्यास अनेक इच्छुकांना या पॅनलमध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बंडखोरीसोबत अनेकांची नाराजीदेखील पक्षांना पचवावी लागणार आहे. सर्वपक्षीय पॅनल झाल्यास मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांचा ठराव झाल्यास आमदार चंद्रकांत पाटील यांची भूमिका बदलण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील हे देखील या जागेसाठी इच्छुक असून, खडसे यांचे नाव निश्चित झाल्यास सर्वपक्षीय पॅनलमध्ये फुटीचीही शक्यता आहे. मुक्ताईनगरच नाही तर इतर ठिकाणीदेखील अशा प्रकारच्या समस्यांना सर्वपक्षीय पॅनलला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे.