जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण कायम झाले आहे. त्यातच वातावरणात आर्द्रतेचे प्रमाणदेखील वाढल्यामुळे प्रचंड उकाडा जाणवत आहे. तापमानातदेखील घट झाली असली तरी उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, ११ मे पर्यंत जळगाव विभागात तापमानात घट होईल. तसेच जिल्ह्यात काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता आहे.
सातपुड्यात पुन्हा वणवा
जळगाव : मार्च महिन्यात जिल्ह्यालगत असलेल्या सातपुडा पर्वतात लागलेल्या आगीमुळे हजारो हेक्टर क्षेत्र जळून खाक झाले होते. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवले होते. मात्र सातपुडा वनक्षेत्रातील बोर अजंती, मालापूर भागात पुन्हा वणवा पेटला असल्याची माहिती या भागातील नागरिकांनी दिली आहे. वनविभागाकडून लागलेली आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून, आगीचे प्रमाण जास्त वाढणार नाही यासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली जात आहे.
खरीप हंगामाच्या मशागतीला सुरुवात
जळगाव : यंदा जिल्ह्यात १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता असून, या वर्षीदेखील जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकरी चांगलाच आनंदी असून खरीप हंगामाच्या तयारीला आता वेग आला आहे. हंगामपूर्व कापूस लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी शेती तयार करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यात यंदाही कापसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढणार असून १ जूनपासून बियाणांची विक्री सुरू केली जाणार आहे.