जळगाव/धुळे/नंदुरबार : विधानसभा निवडणुकीत राज्यात सेना-भाजप युतीलाच बहुमत मिळालेले असल्याने भाजप-सेनेतील मुख्यमंत्रीपदाचा वाद मिटून युतीचे सरकार स्थापन झाल्यास खान्देशातून भाजपचे ५ तर सेनेचे ३ जण मंत्रीपदासाठी दावेदार आहेत. त्यात जळगाव जिल्ह्यातून विद्यमान जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे नाव निश्चित आहे. तर नंदुरबारमधून विजयकुमार गावित, धुळ्यातून जयकुमार रावल यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.सेनेकडून जळगाव जिल्ह्यातून विद्यमान सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी बढती मिळण्याची शक्यता आहे. तर चिमणराव पाटील यांना मागील पंचवार्षिकमध्येच शेवटच्या काही महिन्यांसाठी तापी महामंडळाचे उपाध्यक्षपद देऊन राज्यमंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला होता. त्यामुळे आता सरकारमध्ये त्यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते.जळगाव जिल्ह्यात भाजपकडून गिरीश महाजन यांच्यासह आमदार सुरेश भोळे व आमदार संजय सावकारे यांची नावे चर्चेत आहेत. संजय सावकारे हे तिसऱ्यांदा निवडून आलेले असून त्यांनी राष्टÑवादी-काँग्रेस सरकारमध्ये राज्यमंत्रीपद भूषविलेले आहे. तसेच आमदार सुरेश भोळे हे देखील दुसऱ्यांदा तसेच जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्क्याने निवडून आले असून माजी मंत्री आमदार खडसे व हरिभाऊ जावळे हे लेवा समाजाचे प्रतिनिधी आता सभागृहात नसल्याने लेवा समाजाची नाराजी दूर करण्याची लेवा समाजाचे प्रतिनिधीत्व म्हणून भोळे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.धुळ्यातून मंजुळा गावीत यांचीही शक्यताधुळे : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्य मंत्रिमंडळात कोणाचा समावेश होतो,याची चर्चा सुरू झाली आहे. यावेळी जिल्ह्यातून शिंदखेडा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांचा पहिल्याच टप्प्यात मंत्रिमंडळात समावेशाची शक्यता व्यक्त होत आहे. तसेच साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांचादेखील शिवसेनेतर्फे मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून समावेश होऊ शकतो, अशीही चर्चा सुरू आहे. २०१४ मध्ये जयकुमार रावल यांचा वर्षभरानंतर मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे रोजगार हमी योजना, पर्यटन ही खाती देण्यात आली होती. त्या नंतर त्यांच्याकडे काही काळ अन्न व नागरी पुरवठा या सारखे महत्त्वाचे खाते देण्यात आले होते. निवडणुकांपूर्वी त्यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, पर्यटन या खात्यांचा कार्यभार होता. जयकुमार रावल हे यावेळी चौथ्यांदा निवडून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकट वर्तुळात असलेल्या मंत्र्यांमध्ये त्यांचा समावेश होतो. यावेळी महत्त्वाचे खातेही मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहाद्याचे राजेश पाडवी यांचेही नाव चर्चेतनंदुरबार जिल्ह्यातील चारपैकी दोन जागा भाजपने जिंकल्या आहेत. त्यात माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावीत हे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांनी सलग सहाव्यांदा हा विजय मिळवला. डॉ.विजयकुमार गावीत यांना यापूर्वी मंत्रीपदाचा अनुभव असल्याने त्यांच्या नावाचा या वेळी विचार होऊ शकतो, अशी त्यांच्या समर्थकांमध्ये चर्चा आहे. तर राज्यमंत्रीपद देण्याचा विचार झाल्यास शहाद्याचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाडवी यांचाही विचार होऊ शकतो.
खान्देशातून भाजपचे ५ तर सेनेचे ३ जण मंत्रीपदाचे दावेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2019 11:43 AM