रेल्वे : ''राजधानी'' च्याही फेऱ्या केल्या कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या भीतीने प्रवाशांनी रेल्वे प्रवासाकडे पाठ फिरवल्यामुळे गेल्या आठवड्यात मुंबईकडे जाणाऱ्या पाच रेल्वेगाड्या स्थगित करण्यात आल्या आहेत. राजधानी एक्स्प्रेसच्याही फेऱ्या कमी करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा प्रवाशांच्या प्रतिसादाअभावी भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे सोमवारपासून खान्देश एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे.
कोरोनामुळे राज्यात १५ मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच घराबाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच कोरोनामुळे अनेक ठिकाणच्या बाजारपेठा बंद असल्याने, याचा रेल्वेच्या प्रवासी संख्येवरही मोठा परिणाम झाला आहे. तसेच दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे प्रवाशांचा अल्पप्रतिसाद असलेल्या गाड्या रद्द करण्यात येत आहे.
यात सोमवारपासून भुसावळहून अमळनेर, वसईमार्गे धावणारी (गाडी क्रमांक ०९०१३-१४) भुसावळ - बांद्रा खान्देश एक्स्प्रेसही रद्द करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही गाडी कधीपर्यंत रद्द राहणार याबाबत रेल्वे प्रशासनातर्फे कुठलीही माहिती कळविण्यात आलेली नाही. त्यामुळे ही गाडी कधीपर्यंत बंद राहणार, याबाबत प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
इन्फो :
अमृतसर एक्स्प्रेसही लांबणीवर
रेल्वे प्रशासनातर्फे कोरोनामुळे गेल्या वर्षापासून बंद असलेली अमृतसर एक्स्प्रेस २५ एप्रिलपासून नियमित चालविण्याचे जाहीर केले होते. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने ही गाडी पुन्हा रद्द ठेवली आहे. त्यामुळे ही गाडी आता कधी सुरू होणार याबाबत अनिश्चितता आहे.