जळगाव : प्रजासत्ताकदिनी राजपथावर झालेल्या पथसंचलनात मुलींच्या एनसीसी पथकाचे नेतृत्व करणाऱ्या खान्देश कन्या सिनियर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत हिचे शनिवार दि. ६ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजता आगमन होत आहे. त्यामुळे जळगावकरांच्यावतीने रेल्वे स्टेशनवर तिचे भव्य रॅलीने स्वागत करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रथमच महाराष्ट्रीयन त्यातही जळगावकर मुलीला ही संधी मिळाली आहे. ही सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. पथसंचलनानंतर समृद्धी संत हिचे जळगावात आगमन होत आहे. जळगाव रेल्वे स्टेशनवरून रॅली सुरू होऊन तेथून नेहरू चौक, कोर्ट चौक, स्वातंत्र्य चौक, आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक, जिल्हाधिकारी बंगल्यावरुन मू. जे. महाविद्यालय येथे रॅली संपेल. कोर्ट चौकात छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार असून महापौर भारती सोनवणे तिचे स्वागत करणार आहेत. सर्व जळगावकर नागरिकांनी आपल्या कन्येचे विविध चौकात उत्साहाने स्वागत करावे, असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे.