संजय पाटीलअमळनेर : तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी तथा छत्तीसगड येथील कृषी शास्रज्ञ डॉ. दिनेश सुरेश पाटील यांची कृषी व किसान कल्याण मंत्रालय अंतर्गत भारतीय कृषी अणूसंधान परिषदेवर (आयसीएआर) निवड करण्यात आली आहे. केंद्रीय कृषी मंत्री संजय गर्ग यांनी नियुक्ती केली आहे.देशातील ९ कृषी तज्ञ तथा संशोधक, शास्रज्ञ यांची या समितीवर निवड करण्यात आली आहे. दिनेश पाटील हे अमळनेर तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी असून, गेल्या २२ वर्षांपासून ते छत्तीसगड मध्ये शेतकऱ्यांसाठी कृषी वैज्ञानिक म्हणून कार्य करीत आहेत. त्यांचा जैविक शेतीसाठी प्रयत्न आहे. रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचे तंत्रज्ञान शोधत आहेत. त्याचप्रमाणे कमी खर्चात अधिक उत्पादन घेण्यासाठी त्यांचे संशोधन सुरू आहे. त्यांच्या कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांची निवड करण्यात आली आहे. कृषी अनुसंधान परिषदेतर्फे शेती व्यवसायाचे व धोरणाचे नव्याने नीती निर्धारण, नियोजन व संशोधन करण्यात येणार आहे. या समितीवर हैद्राबाद येथील दोन , गांधीनगर, लखनौ, त्रिपुरा, प्रयागराज, नागपूर आणि छत्तीसगड मधून खान्देशातील सुपुत्र दिनेश पाटील अशा नऊ जणांची निवड करण्यात आली आहे.डॉ. दिनेश पाटील हे खान्देशातील असल्याने या भागातील शेतीच्या अडचणी, वातावरण, पावसाची स्थिती पाहून त्या दृष्टीने संशोधन होईल व शेतकऱ्यांना पुढील धोरणांची मदत होईल, अशी अपेक्षा आहे.
खान्देश सुपुत्र डॉ. दिनेश पाटील यांची भारतीय कृषी अनुसंधान परिषदेवर निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2021 3:18 PM